पँडोरा पेपर्स मध्ये विकासक निरंजन हिरानंदानींचे नाव

पँडोरा पेपर्स मध्ये विकासक निरंजन हिरानंदानींचे नाव

Published on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जगभरात खळबळ उडवून देणार्‍या आयसीजेने प्रसिद्ध केलेल्या पँडोरा पेपर्स मध्ये भारतातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे असल्याचे उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स (बीव्हीआय) येथे नोंदणीकृत असलेल्या एका ट्रस्टची मालकी असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून हिरानंदानी कुटुंबीयांना प्रचंड आर्थिक लाभ मिळाल्याचे समोर आले आहे.

धनाढ्य आणि प्रभावशाली व्यक्तींनी करचोरी करण्यासाठी आणि अमाप संपत्ती लपवण्यासाठी 'टॅक्स हेवन' मानल्या जाणार्‍या देशांमधील ऑफशोअर कंपन्या आणि ट्रस्टचा वापर केल्याचा पर्दाफाश अमेरिकास्थित इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ जर्नालिस्ट्स (आयसीजे) या संस्थेने केला आहे. आयसीजेने कायदा आणि वित्त सेवा क्षेत्रांमधील एकूण 14 संस्थांकडून मिळवलेले तब्बल एक कोटी 19 लाख दस्तऐवज नुकतेच प्रसिद्ध केले.

पँडोरा पेपर्स मधील या यादीत आता रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे नाव असलेल्या हिरानंदानी ग्रुपचे संस्थापक निरंजन हिरानंदानी व त्यांच्या कुटुंबीयांची नावे समाविष्ट झाली आहेत.

ब्रिटनची मालकी असलेल्या ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स या 'टॅक्स हेवन' द्वीपसमूहावर नोंदणी झालेल्या आणि तब्बल 60 दशलक्ष डॉलर मालमत्ता असलेल्या ट्रायडंट ट्रस्टमध्ये निरंजन हिरानंदानी, त्यांचे दुबईस्थित पुत्र दर्शन, पत्नी कमल आणि लंडनस्थित कन्या प्रिया लाभार्थी असल्याची माहिती मिळते. दर्शन हिरानंदानी यांनी 2006 ते 2008 दरम्यान ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स येथे संचालक म्हणून किमान 25 कंपन्या स्थापन केल्या तसेच 'सेटलर' (स्थापनकर्ता) म्हणून द सॉलिटेअर ट्रस्टची नोंदणी केली.

त्यापैकी किमान तीन कंपन्यांवर निरजंन हिरानंदानी राखीव संचालक असल्याचे उघड झाले. हिरकॉन (बीव्हीआय) लि., होरायझन हॉटेल्स (बीव्हीआय) लि. आणि बर्क कन्सॉलिडेटेड अशी या कंपन्यांची नावे आहेत. तेथील बीव्हीआय बिझनेस कंपनीज अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार कंपनीच्या एकमेव संचालकाचा मृत्यू झाल्यास राखीव संचालकाकडे कार्यभार सोपवला जाऊ शकतो.

दर्शन हिरानंदानी यांनी स्थापन केलेल्या या कंपन्यांचे भागभांडवल सॉलिटेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आले. मे 2017 मधील मूल्यांकनानुसार या ट्रस्टकडे 6 कोटी डॉलर मालमत्ता होती.

हिरानंदानी कुटुंबीय सॉलिटेअर ट्रस्टचे लाभार्थी असल्याचे ट्रायडंट ट्रस्टच्या अभिलेखांमधून स्पष्ट होते. या लाभार्थींमध्ये दर्शनसह त्याचे वडील निरंजन, आई कमल, बहीण प्रिया, हिरानंदानी फाऊंडेशन आणि 'सेटलर'चे वंशज आदींचा समावेश आहे. त्यामधील डिस्ट्रिक्ट होल्डिंग्ज लि. या कंपनीने 2008 मध्ये यूबीएस एजी कंपनीशी केलेल्या करारानुसार संयुक्त अरब अमिरातीमधील गेम एव्हिएशन एफझेडसी कंपनीकडून बंबार्डियर चॅलेंजर 850 सीएल-600-2बी19 विमान भाडेपट्ट्याने घेतले होते. त्याव्यतिरिक्त अन्य एकाही कंपनीने कोणताही उल्लेखनीय व्यवसाय केल्याचे आढळत नाही.

दर्शन हिरानंदानी म्हणतात, माझ्या वडिलांचा संबंध नाही

मी अनिवासी भारतीय असून, 2004 पासून दुबईत राहतो. तेथे स्वत:चा रिअल इस्टेट व्यवसाय करतो. दुबईतील शरिया कायद्यामुळे तेथे गुंतवणुकीसाठी ट्रस्ट स्थापन करणे शक्य नव्हते. म्हणून मी बीव्हीआय येथे सॉलिटेअर ट्रस्ट वैयक्तिक गुंतवणुकीसाठी स्थापन केला. त्याच्याशी निरंजन हिरानंदानी किंवा हिरानंदानी ग्रुप यांचा कसलाही संबंध नाही, असा दावा दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. निरंजन हिरानंदानी कधीही मालक-लाभार्थी नव्हते, ते केवळ मुखत्यार लाभार्थी (डिस्क्रिशनरी बेनिफिशियरी) होते. माझे वडील आणि आई या दोघांनाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

* ऑफशोअर कंपन्या स्थापन करणे बेकायदा नसले, तरी प्रामुख्याने परदेशांत बेनामी गुंतवणूक करून कर चुकवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

* अशा कंपन्यांची नोंदणी एका देशात केली जाते, तर व्यवसाय वेगळ्याच देशात केला जातो. कंपन्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुलभ असलेले आणि मालकाची ओळख लपवणे शक्य असलेले देश त्यासाठी निवडले जातात.

* अशा देशांत कंपनी कर अत्यल्प असतो अथवा अस्तित्वातच नसतो. त्यामुळे त्यांंना 'टॅक्स हेवन' म्हटले जाते. या कंपन्या केवळ कागदावर असतात. त्यांचे कोठेही कार्यालय नसते, तसेच कर्मचारीही नसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news