नितीन गडकरी म्हणाले, मोटारीत फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य

नितीन गडकरी म्हणाले, मोटारीत फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य

Published on

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : मोटार कंपन्यांनी आपापल्या कारच्या निर्मितीत फ्लेक्स फ्यूएल इंजिनचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दोन दिवसांत तसे आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. कारनिर्मिती क्षेत्रावर या निर्णयाचा कुठलाही अतिरिक्‍त भांडवली भार येणार नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

मोटार एक तर डिझेल इंजिनवर चालणारी असते किंवा पेट्रोल इंजिनवर किंवा मग अशा मोटारीला गॅस सिलिंडरवर चालविता येईल, अशी रचना करून घेतली जाते. दुसरे म्हणजे बाय-फ्यूएल इंजिन. यात एकाच इंजिनसाठी विविध इंधनांच्या स्वतंत्र टाक्यांची सुविधा असते.

फ्लेक्स फ्यूएल इंजिनचे वैशिष्ट्य म्हणजे ते मोटारीत बसविल्यास पेट्रोल, डिझेलसह अन्य उपलब्ध इंधनांचा थोडक्यात एकापेक्षा अधिक इंधनांचा वापर केला जाऊ शकतो आणि स्वतंत्र टाक्यांचीही सोय करावी लागत नाही. इंधनावर होणारा खर्च कमी करणे, हा नव्या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे, असे गडकरी म्हणाले.

भारतात दरवर्षी 8 लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करावी लागते. भारत कायमच पेट्रोलियम उत्पादनांसाठी अन्य देशांवर अवलंबून राहिल्यास त्याचे आयात बिल 25 लाख कोटींपर्यंत पोहोचेल. फ्लेक्स फ्यूएलमुळे पेट्रोलियम उत्पादनांची आयात कमी होईल, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

मारुती, ह्युंदाईचा प्रतिसाद

मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्सच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वाहनांमध्ये फ्लेक्स फ्यूएल इंजिन वापरणार असल्याची ग्वाही दिल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

बाय-फ्यूएल इंजिनमध्ये वेगवेगळे टँक असतात. मात्र, फ्लेक्स फ्यूएल इंजिनमध्ये एकाच टँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंधने भरता येतात.

फ्लेक्स फ्यूएल म्हणजे काय?

फ्लेक्स फ्यूएलचा अनुवाद करायचा तर तो 'लवचिक इंधन' होय. या पर्यायी इंधनाची निर्मिती पेट्रोल, गॅसोलिन तसेच मिथेनॉल अथवा इथेनॉलच्या संयोगातून केली जाते. सध्या भारतात पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते.

इथेनॉलचे हे प्रमाण येत्या दोन वर्षांत वाढवत नेले जाणार आहे. अमेरिका, ब्राझील आणि कॅनडा या देशांत फ्लेक्स इंजिनचा वापर केला जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

…असे काम करते फ्लेक्स इंजिन

फ्लेक्स इंजिनमध्ये फ्यूएल मिक्स सेंसरचा वापर होतो. इंधनातील मिश्रणाच्या प्रमाणाच्या हिशेबाने इंजिन स्वत:ला अ‍ॅडजेस्ट करते. तुम्ही गाडी चालवणे सुरू करता तेव्हा हे सेंसर इथेनॉल, मिथेनॉल, गॅसोलिनचे प्रमाण तसेच इंधनातील अल्कोहोल कन्सन्ट्रेशन लक्षात ठेवते. नंतर ते इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूलकडे तसे संकेत पाठवते. हे कंट्रोल मॉड्यूल त्यानुसार वेगवेगळ्या इंधनांचा वापर-उपयुक्‍ततेचे नियमन करते.

लिटरमागे 20-30 रुपयांची बचत

इंजिन डिझाईन झाल्यानंतर पेट्रोल, डिझेलची फार गरज पडणार नाही. इथेनॉलचे दर 60-62 रुपये लिटर असतील. फ्लेक्स इंजिन असलेल्या गाड्या त्यावर धावू शकतील. फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे इंधनात लिटरमागे 20 ते 30 रुपये बचत शक्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news