नारायण राणे : शिवसेना संपवण्यासाठी राऊतांना राष्ट्रवादीची सुपारी

नारायण राणे : शिवसेना संपवण्यासाठी राऊतांना राष्ट्रवादीची सुपारी

Published on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : खासदार संजय राऊत हे अर्धे राष्ट्रवादीचे आहेत असे म्हटले जाते. पण, ते खरे नाही. ते पूर्ण राष्ट्रवादीचेच आहेत. शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे. त्यांचा डोळा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

'ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील', असा खोचक टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला. ते पुढे म्हणाले, "संजय राऊत 'लोकप्रभा'मध्ये असताना उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांवरही टीका करायचे. पुढे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने ते खासदार झाले.

काल ते ज्या भाषेत बोलले ती पत्रकार आणि संपादकाची भाषा नव्हे! अस्वस्थ होऊन बेजबाबदारपणे ते काहीही आरोप करीत सुटले होते. प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या जबाबानंतर त्यांचा थयथयाट सुरू आहे. पत्रकार आहेस तर तुला कळले पाहिजे, केवळ आरोप करू नको. मालमत्ता असल्याचे पुरावेही दे! तू जमीन किती लाखात घेतली, बरं ते पैसे आणले कुठून? हा सुजित पाटकर कोण? त्याच्या

कंपनीत तुमच्या मुली संचालक कशा असू शकतात, याची आधी उत्तरे द्या", असे आव्हान राणे यांनी त्यांना दिले. "आम्ही शिवसेना वाढीसाठी कष्ट घेतले. तुम्ही काय केले. कधी पाच पैसे तरी दिले का?" असा सवाल त्यांनी केला. "यांचे लक्ष शिवसेना वाढविणे हे नाही तर उद्धव ठाकरे हे ज्या खुर्चीवर बसले आहेत ती जागा मिळविणे हे आहे. तुमची सर्व कुंडली माझ्याकडे आहे. सगळी बाहेर काढून टाकेन", असा इशाराही राणे यांनी दिला.

"तुमच्या सर्व व्यवहारांची मला माहिती आहे. हा पगारी नेता आहे. शिवाय ओव्हर टाईम करूनही कमावतो आहे. प्रवीण राऊतच्या चौकशीनंतर आता आपणही अडचणीत आहोत, अनिल परबना अटक होणार, आता आपल्यालाही होणार म्हणून अस्वस्थ आहे", अशा शब्दांत संजय राऊत यांचे वाभाडे राणे यांनी काढले. ईडीच्या अधिकार्‍यांनी एवढे गप्प बसू नये, त्यांची थोडी पूजा करावी, त्याशिवाय गप्प नाही होणार, असा इशाराही राणे यांनी दिला.

मेडिकल कॉलेजसाठी मला सातवेळा फोन केला, विसरलात का? : नार्वेकरांचा पलटवार

नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्यात आणि मिलिंद नार्वेकरांत ट्विटर वॉर झाल्याचे पाहायला मिळाले. नार्वेकर यांचा उल्लेख राणे यांनी 'मातोश्री'तील बॉय असा केला होता. त्याला मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरून उत्तर दिले. त्यांनी म्हटले आहे की, मी बॉय काय, अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजला साहेबांकडून परवानगी मिळवून द्यावी म्हणून दिवसभरात तुम्ही मला सातवेळा फोन केला होतात. विसरलात काय? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी? यावर काही वेळातच राणे यांनीही ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले. सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर तुमच्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा फोन केला होता हे आपण विसरलात काय? अशा किती घटना मी आपल्याला सांगू? मला बोलायला लावू नका, असे प्रत्युत्तर नारायण राणे यांनी ट्विटरद्वारे मिलिंद नार्वेकरांना दिले.

नार्वेकर 'मातोश्री'चा बॉय

संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राणे कुत्सितपणे म्हणाले, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी 'मातोश्री'मध्ये बॉयचे काम करायचे तेच का? माझ्यासमोरची गोष्ट आहे ही. मी पाहिले आहे की बेल मारली की येस सर, काय आणू? असे म्हणणारा आता नेता बनला आहे. अनिल परब तर काय प्रख्यात वकील. हल्ली अ‍ॅडव्होकेट जनरलला ते मार्गदर्शन करीत असतात. कुणाला कुठे अटक करावी याबाबत त्यांचेच फोन सगळीकडे जातात. आता ते आतमध्ये गेल्यावर त्यांना किती फोन जातात हा प्रश्न आहे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

माझा डोळा शिवसेनेच्या विस्तारावर : संजय राऊत

मुंबई : मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्‍त आहे. माझा असलाच तर फक्‍त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले. 2024 साली शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि बरेचसे लोक तेव्हा बेरोजगार झालेले असतील, असा टोला त्यांनी लगावला. आम्हाला अटक होणार असेल तर होऊ दे. आम्ही घाबरत नाही, असे राऊत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news