

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लिलावामध्ये काढलेल्या आहेत. परंतू शेतकऱ्यांची परिस्थिती ही हलाखीची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी माजी गृहमंत्री तथा काटोलचे आमदार अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली मदत ही फारच कमी आहे. दुसरीकडे नागूपर जिल्हात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान होवूनही अद्याप मदत मिळाली नाही. नापिकीतून सोयाबीन व कापसाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जे कर्ज घेतले होते ते त्यांना भरता आले नाही. परंतु आता बँकेने कर्ज वसुली करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यामुळे कार्यवाहीस स्थगिती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी एक पत्राव्दारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ज्या शेतकऱ्यांवर थकीत कर्ज आहे आणि ज्यांच्या शेतीचा लिलाव होत आहे, अशा शेतकऱ्यांची यादी बॅनरच्या माध्यामातून चौका चौकात लावण्यात आली आहे. यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची नाहक बदनामी करण्यात येत आहे. या गंभीर बाबीचा सुध्दा अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.
हेही वाचा :