नवीन कर्णधार रोहित शर्माला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत हवी सुट्टी

नवीन कर्णधार रोहित शर्माला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत हवी सुट्टी
Published on
Updated on

मुंबई ; वृत्तसंस्था : सततच्या क्रिकेटमुळे टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघातून विराट, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा या सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतूनही विश्रांती मागितली आहे आणि तो मुंबईत होणार्‍या दुसर्‍या कसोटीत खेळणे अपेक्षित आहे. या मालिकेत बीसीसीआय बुमराह, शमी, शार्दुल व ऋषभ पंत यांनाही विश्रांती देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित सांभाळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता नवीन कर्णधार रोहित नेही कसोटी मालिकेतून विश्रांती मागितली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी मालिकेत किवींचा सामना करण्याची शक्यता आहे.

भारतीय खेळाडू मागील 6 महिन्यांपासून 'बायो बबल'मध्ये आहेत. इंग्लंड दौरा, आयपीएल 2021, टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर आता टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. 17 नोव्हेंबरपासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ती जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

लोकेश राहुल उपकर्णधार असणार, ही घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली. विराटने विश्रांती घेतली आहे आणि आता नवीन कर्णधार रोहित नेही बीसीसीआयकडे सुट्टी मागितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता कर्णधार कोणाला करावे, हा प्रश्न बीसीसीआयला सतावत आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पहिल्या कसोटीत 36 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर विराट पितृत्व रजेवर गेला होता आणि तेव्हा अजिंक्यने युवा खेळाडूंना सोबत घेऊन टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले व संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता. त्यामुळे कसोटी मालिकेत विराट व रोहितच्या अनुपस्थितीत अजिंक्यकडेच ही जबाबदारी राहील. बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही.

विराटने कर्णधार रोहितचे मार्गदर्शक व्हावे : सेहवाग

नवी दिल्ली : विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या टी-20 संघात आता विराट कोहलीची भूमिका काय असावी हे त्याने सांगितले आहे. सेहवागच्या मते, सचिन तेंडुलकर भारतीय संघासाठी जी भूमिका बजावत होता, तीच भूमिका आता विराट कोहलीनेही साकारायला हवी.

वीरेंद्र सेहवागच्या म्हणण्यानुसार, अनेक दिग्गज फलंदाज सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि एम. एस. धोनी संघात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत आणि गरज पडल्यास कर्णधाराला टिप्सही देत असत. विराट कोहलीनेही भारतीय संघासाठी हीच भूमिका बजावली पाहिजे, असे सेहवागने सांगितले.

एका संकेतस्थळावरील संभाषणात वीरेंद्र सेहवाग म्हणाला, सचिन तेंडुलकर त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळला. एखादा नवा कर्णधार आला तरी तो त्याचे विचार त्यांच्याशी शेअर करायचा. त्यानंतर कर्णधार ती गोष्ट अंमलात आणायचा. विराट कोहली, आणि रोहित शर्मा हे अनुभवी आहेत. तरुणांना पाठिंबा देणे हे त्यांचे काम असेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या फॉरमॅटमध्ये भारताचा नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. के. एल. राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. संघातील काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान यांचा समावेश करण्यात आला आहे. यजुवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड आणि मोहम्मद सिराज संघात परतले आहेत. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड संघाचा पहिला सामना 17 नोव्हेंबरला होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news