

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मनी लाँडरिंग प्रकरणीत ईडीने अटक केलेल्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा म्हणून भाजप आक्रमक झाला आहे. गुरुवारी राज्यभरात सुमारे एक हजार ठिकाणी भाजपने निदर्शने करीत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दादर येथे आंदोलन करण्यात आले. मलिक यांनी राजीनामा देईपर्यंत भाजपचे आंदोलन चालू राहील, असा इशारा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला.
दाऊद हा देशाचा दुश्मन आहे व त्याच्याशी संबंध असणाराही देशाचा दुश्मन असल्याचे मान्य करा. नवाब मलिक यांना आता मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ठाकरे सरकारमधील अनेक मंत्री घोटाळेबाज आहेत. त्यामुळे सरकारलाच सत्तेवर राहण्याचा अधिकार उरला नसल्याचा आरोप त्यांनी केला.