

कोल्हापूर ; सुनील कदम : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने नवीन किंवा पर्यायी पुणे-बंगळूर महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा नवा पुणे-बंगळूर महामार्ग प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांच्या विकासावर घाला घालायला कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे नवीन महामार्ग तयार करण्याऐवजी आहे तोच पुणे-बंगळूर महामार्ग आठपदरी करण्याची मागणी या भागातून जोर धरू लागली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्यात पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना नवीन पुणे-बंगळूर महामार्गाची घोषणा केली होती. प्रामुख्याने पुणे शहराची झपाट्याने होत असलेली वाढ आणि वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन हा नवीन महामार्ग पुणे शहराबाहेरून तयार करण्यात येणार आहे. या नवीन महामार्गालगत जुळे पुणे शहर वसवावे, अशी सूचनाही गडकरी यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे येत्या सहा महिन्यांत या नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचेही गडकरी यांनी सूचित केले आहे.
नवीन पुणे-बंगळूर महामार्गासाठी सध्या तरी दोन पर्याय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विचाराधीन आहेत. पुणे (हडपसर)-सासवड-बारामती-फलटण-मायणी-विटा-तासगाव-मिरज-चिकोडी-बेळगाव-बंगळूर असा एक पर्याय आहे, तर दुसरा पर्याय पुणे-हडपसर-जेजुरी-विटा (बायपास)-तासगाव (बायपास)-मिरज (बायपास)-चिकोडी-संकेश्वर ते सध्याचा महामार्ग असा दुसरा पर्याय आहे.
या दोन्हींपैकी कोणताही पर्याय निवडला, तरी सध्या पुणे-बंगळूर महामार्गावर असलेली कोल्हापूर, कराड, सातारा ही प्रमुख शहरे या नवीन महामार्गापासून अलिप्त राहणार आहेत. कारण, या तिन्ही शहरांच्या 52 ते 120 किलोमीटर अंतरावरून हा नवीन महामार्ग जाणार आहे. त्याचप्रमाणे हा महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार असला, तरी सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव, सांगली आणि मिरज या शहरांच्या कित्येक किलोमीटर बाहेरून जाणार आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूर, कराड आणि सातारा शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या विकासाला खर्या अर्थाने या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच चालना मिळालेली दिसते. या तिन्ही शहरांचा आणि दोन जिल्ह्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आर्थिक, व्यापार, दळणवळण आणि औद्योगिक विकासाला या महामार्गामुळे चालना मिळालेली दिसते. याशिवाय या महामार्गामुळे महामार्गालगत असलेल्या गावांचाही चौफेर विकास होण्यास हातभार लागलेला आहे. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. या महामार्गामुळे हे तीन जिल्हे उर्वरित महाराष्ट्रासह उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडले गेलेले आहेत.
मात्र, नवा पुणे-बंगळूर महामार्ग यामुळे प्रामुख्याने कोल्हापूर आणि सातारा हे दोन जिल्हे दळणवळणाच्या प्रमुख मार्गावरून काहीसे बाजूला फेकले जाणार आहेत. नवीन महामार्गामुळे कर्नाटक, तामिळनाडूसह दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे जाणारी सर्वप्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे.
तसे झाल्यास आपोआपच कोल्हापूर, कराड आणि सातारा या तीन शहरांसह कोल्हापूर आणि सातारा हे दोन जिल्हे अनेक बाबतींत उपेक्षित राहण्याचा धोका आहे. सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, तासगाव आणि विटा या शहरांच्या पार बाहेरून हा नियोजित महामार्ग जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील वाहतूक वाढण्याशिवाय सांगली जिल्ह्याच्या पदरातही फार काही पडण्यासारखी अवस्था नाही.
सध्या पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे या महामार्गाचे सहापदरीकरण, आठपदरीकरणाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्याऐवजी केंद्रीय रस्ते मंत्रालयाने नव्या रस्त्याचा घाट घातल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या या नव्या रस्त्यासाठी तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे पुणे ते बंगळूरपर्यंत आठपदरीकरण करायचे झाल्यास महामार्गाच्या सध्याच्या खर्च प्रमाणानुसार केवळ पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे 40 हजार कोटी रुपये खर्चून नवीन पुणे-बंगळूर महामार्ग करण्याऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे आठपदरीकरण करावे, अशी या भागातील लोकांची मागणी आहे.
साधारणत:, बावीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातील काही मंडळींनी अशाच स्वरूपाच्या मुंबई-बंगळूर महामार्गाची संकल्पना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या राजवटीत मांडली होती; पण तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी या नव्या महामार्गाची अव्यवहार्यता विचारात घेऊन ती मागणी फेटाळून लावली होती. त्याचप्रमाणे या नव्या महामार्गामुळे कोल्हापूर-सातार्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या समतोल विकासात अनावश्यक अडथळे निर्माण होण्याची शक्यताही हा प्रस्ताव फेटाळताना संबंधित मंत्र्यांनी व्यक्त केलेली होती.