

नगर ; प्रतिनिधी : नगर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीत एका प्लॅटला बुधवारी रात्री भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व अहमदनगर महानगरपालिकाच्या चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान, कंपनीतील कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.
राहुरीवरुनही अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. रात्री उशिरा पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
नगर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीच्या आवारात बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आग लागली. याची माहिती एमआयडीसी, अहमदनगर महानगरपालिकेला मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. व्हक्युम पंप फुटल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान आगी बाबत माहिती देण्यास कंपनी व्यवस्थापनाने नकार दिला. माध्यमांनाही घटनास्थळी प्रवेश नाकारण्यात आला आहे.
पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.