धनंजय महाडिक यांच्या विजयाने जिल्ह्यात राजकीय संघर्षाला धार

धनंजय महाडिक यांच्या विजयाने जिल्ह्यात राजकीय संघर्षाला धार
Published on
Updated on

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेतील विजयाने कोल्हापूरच्या राजकारणातील समांतर वाटचाल सुरू होणार आहे. सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या संघर्षाला धार येणार आहे. याचबरोबर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला विशेषतः महाडिक गटाला राजकीय बळ मिळाले आहे. त्याचा परिणाम महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या राजकारणावर होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते संजय पवार यांच्या विजयाची खात्री देत होते. मग ऐनवेळी संजय पवार यांचा घात कोणी केला? पुरेशी मते व राज्यात सत्ता असूनही महाविकास आघाडीची 10 मते फुटली कशी? मतं फुटण्याची 'भानामती' कोणाच्या आदेशाने झाली? संजय पवारांच्या पराभवात पडद्यामागील सूत्रधार कोण? त्या 10 आमदारांना महाडिक यांना मतदान करण्याचा आदेश कोणी दिला? याचीच चर्चा आता रंगली आहे.

राज्यसभेची निवडणूक संजय पवार विरुद्ध धनंजय महाडिक अशी होती. सुरुवातीला संजय पवार बाजी मारणार असे वाटत असतानाच अचानकपणे धनंजय महाडिक यांना भाजपने आखाड्यात उतरविले आणि कोल्हापूरच्या मल्लांमध्येच लढत रंगली.

भाजप प्राधान्यक्रमाच्या मतदानात फार काटेकोर असतो, असे वारंवार सांगितले जात होते; पण महाविकास आघाडीकडेही नेत्यांची कमतरता नव्हती. शरद पवार यांच्यासारखे सर्वात अनुभवी नेते आघाडीकडे असूनही व राज्यात सत्ता असूनही आघाडीच्या उमेदवाराचा पराभव हा महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी लाजिरवाणा आहे. या पराभवाचे खापर आता आमदारांची नावे घेऊन फोडले जात आहे. मात्र, त्यांना आदेश देणारे कोण? हे जोवर समोर येत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही.

निवडणुकीत संजय पवार यांचा पराभव झाला नाही तर तो महाविकास आघाडीच्या नेत्यांचा झाला आहे. एकमेकांकडे बोट दाखवून समाधान करून घेण्यापेक्षा आघाडीच्या अंतर्गत कलहाकडे लक्ष द्यायला हवे. राज्यसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक येत असते. मात्र, त्याला सामोरे जाण्यासाठी आघाडीत ऐक्य हवे.

धनंजय महाडिक यांच्या विजयाने भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात कमळ फुलले आहे. भाजपला विशेषतः महाडिक गटाला बळ मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना 78 हजारांवर मते मिळाली. भाजपच्या मतांमध्ये 38 हजारांची वाढ झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र असूनही महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयासाठी आघाडीच्या नेत्यांना कसरत करावी लागली.

जिल्ह्यात सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व विविध संस्थांवर आहे. विसर्जित कोल्हापूर महापालिका व कोल्हापूर जिल्हा परिषदेवरही त्यांचेच वर्चस्व होते. महापालिका आणि जिल्हा परिषदेवर असलेले महाडिक गटाचे वर्चस्व मोडून त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. आता होणार्‍या निवडणुकीत त्यांच्यातील सामना धारधार होईल. त्याचबरोबर 12 पंचायत समित्या, 8 नगरपालिका, इचलकरंजी महापालिका यामध्ये पाटील-महाडिक असाच सामना रंगतदार होणार आहे.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील-महाडिक गटाचा कस लागणार आहे. सध्या तिथे महाडिक गटाची सत्ता आहे. तेथे सत्तेसाठी सतेज पाटील गटाने जोरदार तयारी केली आहे. गोकुळची सत्ता गेल्यानंतर महाडिक गटाकडे राहिलेले हे एकमेव सत्तास्थान आहे. या सत्तास्थानाला जोरदार धक्का देण्याची तयारी पाटील गटाने केली आहे.

विधान परिषदेला महादेवराव महाडिक, लोकसभेला धनंजय महाडिक, विधानसभेला अमल महाडिक यांच्या सततच्या पराभवांनंतर त्याचबरोबर शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षपदानंतर जिल्हा परिषदेतील सत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्याचा आर्थिक बलाढ्य राजकीय गड असलेल्या गोकुळच्या सत्तेवर पाटील-मुश्रीफ-मंडलिक गटाने आपले वर्चस्व मिळविले आहे. शौमिका महाडिक तेथे सतत प्रश्न उपस्थित करून सत्ताधार्‍यांना जाब विचारत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता धनंजय महाडिक यांची राज्यसभेवरील निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. जिल्ह्यात भाजपला बळ मिळाले आहे. महाडिक गटाला एक सत्तास्थान मिळाले आहे. त्याचा वापर आता गेलेल्या सत्ताकेंद्रांवरील कब्जा करण्यासाठी होईल. मात्र, तो संघर्ष तीव्र असेल.

लोकसभेला मंडलिक यांच्याविरुद्ध कोण लढणार?

2014 च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक हे पाटील यांच्या विरुद्ध रिंगणात उतरले आणि विजयी झाले. याचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटील यांनी 2015 ला महादेवराव महाडिक यांना विधान परिषदेत पराभूत करून त्यांची 18 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. त्यानंतर 2019 मध्ये 'आमचं ठरलंय' म्हणत राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांना पराभूत करीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्या मागे सर्व शक्ती उभी केली. त्यानंतर कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांना पराभूत करून आपले पुतणे ऋतुराज पाटील यांना विधानसभेत पाठविले. आता संजय मंडलिक यांच्या विरुद्ध उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

महाडिक-आवाडे-कोरे गट सक्रिय होणार

जिल्ह्याच्या राजकारणात विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून आपले स्थान निर्माण केले आहे, तर ताराराणी पक्षाच्या माध्यमातून प्रकाश आवाडे कार्यरत आहेत. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत हे दोघेही भाजपकडून सक्रिय होते. महाडिक यांचे नातलग सत्यजित कदम हेच रिंगणात असल्याने या निवडणुकीची सारी सूत्रे महाडिक गटाच्या हातात होती. जिल्ह्यात यापुढच्या राजकारणात महाडिक-आवाडे-कोरे गट सक्रिय होण्याचे संकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news