धक्कादायक निकालाने बाद फेरीचे चित्र बदलले

धक्कादायक निकालाने बाद फेरीचे चित्र बदलले
Published on
Updated on

     विश्वचषक विश्लेषण

  • प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

कतारमधील ही विश्वचषक स्पर्धा सर्वार्थाने वेगळी ठरत आहे. या स्पर्धेसाठी तयार केलेली स्टेडियम, या स्टेडियममध्ये असलेली कूलिंग सिस्टीम यामुळे ही स्पर्धा वेगळी ठरली. त्याप्रमाणे या स्पर्धेतील सुरुवातीपासूनचे अनपेक्षित निकालसुद्धा या स्पर्धेचे वेगळेपण ठरत आहे. ग्रुप स्टेजमधील पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये काही निकाल धक्कादायक लागलेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे तिसर्‍या फेरीचे सर्व सामने चुरशीचे होतील यात शंका नव्हती, त्याप्रमाणेच आता सर्वच सामने चुरशीचे होत आहेत. ग्रुप 'सी' मधून अर्जेंटिना आणि पोलंड यांनी बाद फेरीत प्रवेश केला. तर ग्रुप 'डी' मधून फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया बाद फेरीसाठी पात्र ठरले. फ्रान्सला पराभूत केल्यावर ट्युनिशियाने विश्वचषक जिंकल्यासारखा आनंद व्यक्त केला, तर डेन्मार्कला नमवत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश केला.

ग्रुप 'सी'मध्ये अर्जेंटिनाला शेवटच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यकच होते. हा सामना पराभूत झाले असते किंवा पोलंडने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले असते तर अर्जेंटिनाचे विश्वचषकातील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले असते. त्यामुळे अर्जेंटिनाने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. पोलंडच्या संघाला या सामन्यातून बरोबरीचा एक गुण मिळाला असता तरी ते बाद फेरीसाठी पात्र ठरत होते. मुळातच पोलीश संघ बचावात्मक खेळावर भर देतो त्यामुळे या सामन्यात त्यांनी अर्जेंटिनाची आक्रमण रोखण्यासाठी 4-2-3-1 तर विजय आवश्यक असल्यामुळे आक्रमक खेळाशिवाय पर्याय नाही हे ओळखून अर्जेंटिनाने 4-3-3 या फॉर्मेशनसह मैदानात उतरले. अर्जेंटिनाने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली रचायला सुरुवात केली. मेस्सी तर त्याला बॉल मिळाल्यानंतर लाँग शॉटद्वारे गोल करण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्या हाफमध्ये 27 आणि 35 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला अतिशय चांगल्या संधी मिळाल्या होत्या, पण त्याचे रूपांतर त्यांना गोलमध्ये करता आले नाही. 37 व्या मिनिटाला पोलीश गोलकिपरने मेस्सीला अडवताना केलेल्या चुकीबद्दल अर्जेंटिनाला पेनल्टी किक मिळाली. मुख्य पंचांनी ही पेनल्टी दिली नव्हती. व्हीएआरमध्ये ही पेनल्टी बहाल करण्यात आली, पण या पेनल्टीवर मेस्सीला गोल नोंदविता आला नाही. पोलीश गोलकिपरने अतिशय उत्कृष्टपणे ही पेनल्टी किक अडवली. दुसर्‍या हाफमध्ये मात्र मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे अर्जेंटिनाचे दोन गोल झाले. यानंतर मात्र पोलंडचा संघ सावध खेळू लागला. कारण त्यांच्यावर आणखी एखादा गोल झाला असता तर गोलस्कोरवर मेक्सिको गुणतालिकेत त्यांच्या पुढे गेले असते आणि पोलंडचा संघ स्पर्धेबाहेर पडला असता. पहिला सामन्यातील नामुष्कीजनक पराभवानंतर सावरत अर्जेंटिनाने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला. राऊंड ऑफ 16 मध्ये त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होईल.

याच गटातील दुसर्‍या सामन्यात मेक्सिकोने सौदी अरेबियाला 2-1 गोलने पराभूत करत विजय मिळवला, पण हा विजय त्यांना बाद फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरा ठरला. या गटात पोलंड आणि मेक्सिकोचे प्रत्येकी चार गुण होते, पण सरस गोलस्कोरमुळे पोलंड बाद फेरीसाठी पात्र ठरले तर दुर्दैवी मेक्सिको स्पर्धेबाहेर फेकला गेला.

ग्रुप 'डी' मध्ये ट्युनिशियाने गतविजेत्या फ्रान्सचा 1-0 गोलने पराभव करत स्पर्धेतील धक्कादायक निकालांची मालिका सुरू ठेवली. फ्रान्स या गटात सहा गुणांसह अव्वल स्थानावर होता. या सामन्यातील हार-जीत त्यांच्या अव्वल स्थानावर काहीच परिणाम करत नव्हता. त्यामुळे या सामन्यात फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी संघामध्ये नऊ बदल केले. मुख्य खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांनी बेंचवरील खेळाडूंना या सामन्यात संधी दिली. ही संधी बाद फेरीचा द़ृष्टीने खेळाडूंची केलेली चाचणी होती. फ्रान्सचे महत्त्वाचे खेळाडू या सामन्यात खेळत नसले तरी फ्रान्सचा संघ ट्युनिशियाच्या तुलनेत वरचढ वाटत होता. पण 9 बदलांमुळे एकमेकांबरोबर असलेला समन्वय चांगला नव्हता. ट्युनिशियाने याच गोष्टीचा फायदा करून घेत फ्रान्सवर पहिल्याच हाफमध्ये एक गोल नोंदवला आणि त्यानंतर शेवटपर्यंत फ्रान्सला गोल करण्यापासून रोखून धरले. सामना संपत असताना अँटोनिओ ग्रीझमनने गोल करत फ्रान्सला बरोबरी मिळवून दिली, पण व्हीएआरमध्ये ऑफसाईड दिसत असल्यामुळे हा गोल नाकारण्यात आला. ट्युनिशियाला त्यांच्या विश्वचषक इतिहासातील पहिल्या मोठ्या संघाविरुद्धच्या विजयाची नोंद करता आली. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत संघाची लय चांगली ठेवायची असेल तर कोणताही प्रशिक्षक विनिंग कॉम्बिनेशन बदलत नाहीत. पण प्रशिक्षक डेशचॅम्प यांनी संघामध्ये नऊ बदल केले आणि त्याचाच तोटा त्यांना पराभवाच्या रूपाने सहन करावा लागला. पराभव होत असताना प्रशिक्षक डेशचॅम्प यांच्या चेहर्‍यावरील तणाव स्पष्ट जाणवत होता. राऊंड ऑफ 16 मध्ये फ्रान्सचा सामना पोलंडबरोबर होईल.

याच गटातील दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कचा 1-0 असा पराभव केला. स्पर्धा सुरू होण्याअगोदर डेन्मार्कचा संघ या गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरेल, असे सर्वांना वाटत होते. पण संपूर्ण स्पर्धेत डेन्मार्कला दर्जेदार स्ट्रायकरची कमतरता जाणवली. बाद फेरीत पोहोचण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक असल्यामुळे पहिल्यापासूनच डेन्मार्क संघ दबावाखाली खेळताना दिसला. संपूर्ण सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण होऊनसुद्धा फिनिशिंगमध्ये त्यांना अपयश आले. विश्वचषक पात्रता फेरीत इतर युरोपियन संघांपेक्षा डेन्मार्कची कामगिरी अतिशय चांगली होती. सलग नऊ सामने जिंकत त्यांनी चांगली लय प्राप्त केली होती, पण ही लय विश्वचषकात त्यांना टिकवता आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news