साहित्‍य : द्वेषाची पाळेमुळे किती खोल?

साहित्‍य : द्वेषाची पाळेमुळे किती खोल?
Published on
Updated on

विनायक सरदेसाई

एका मुलाखतीत सलमान रश्दी यांनी सांगितले होते की, मृत्यूच्या असंख्य धमक्यांच्या छायेखाली एवढी वर्षे काढल्यानंतर आता माझे जीवन सामान्य होऊ लागले आहे. परंतु ही परिस्थिती कायम राहिली नाही आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाच. प्रेमाप्रमाणेच द्वेषाची भावनासुद्धा लवकर द़ृष्टिआड होणारी नाही, हीच गोष्ट या हल्ल्यातून दिसून आली.

वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेत झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. या माणसाची लेखणी नेहमीच चर्चेत असते. त्यांची एक कादंबरी जगातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक ठरते, तर दुसर्‍या कादंबरीत मूलतत्त्ववाद्यांच्या भावना इतक्या दुखावल्या जातात की, 44 वर्षांनंतर त्यांना प्राणघातक हल्ल्याला सामोरे जावे लागते. 12 ऑगस्टच्या रात्री न्यू यॉर्कमधील कार्यक्रमादरम्यान हदी मातर नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर स्टेजवर जाऊन हल्ला केला. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात जारी करण्यात आलेल्या फतव्याची आठवण या घटनेमुळे संपूर्ण जगाला झाली. या फतव्याद्वारे रश्दींची हत्या करणार्‍या व्यक्तीला मोठ्या रकमेचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

इतक्या वर्षांमध्ये रश्दी सतत मृत्यूच्या धोक्याखालीच होते. ते अनेक वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहत होते आणि गेल्या दोन दशकांपासून ते न्यू यॉर्कमध्येच स्थायिक आहेत. हल्ल्यापासूनच 75 वर्षीय रश्दी यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना पेनसिल्व्हेनिया एरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रारंभिक आयुष्याबद्दल सांगायचेे झाल्यास, अहमद सलमान रश्दी यांचा जन्म 19 जून 1947 रोजी मुंबईच्या एका काश्मिरी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनिस अहमद रश्दी यांनी केंब्रिजमध्ये शिक्षण घेतले आणि सुरुवातीला वकिली केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

सलमान रश्दी यांची आई नेगिन बट्ट या शिक्षिका होत्या. त्यांना आणखी तीन बहिणी आहेत. रश्दी यांचे बालपण मुंबईतच व्यतीत झाले आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण दक्षिण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लंडमधील वॉर्विकशायर येथील रग्बी स्कूलमध्ये पाठविले आणि त्यांनी पुढील शिक्षण किंग्ज कॉलेज केंब्रिज येथे पूर्ण केले. त्यांनी इतिहास या विषयासह कला शाखेची पदवी संपादन केली.

शिक्षण पूर्ण केल्यावर रश्दी यांनी एका जाहिरात कंपनीत कॉपीरायटर म्हणून काम केले आणि याच काळात त्यांनी आपल्या कल्पना कागदावर उतरवण्यास सुरुवात केली. त्यांची पहिली कादंबरी म्हणजे 'ग्रिम्स.' ती फारशी चर्चेत आली नाही; परंतु पुढील कादंबरीने रश्दी थेट जगप्रसिद्धच झाले. या कादंबरीचे नाव आहे 'मिडनाइट्स चिल्ड्रन.' या कादंबरीला 1981 मध्ये 'बुकर पुरस्कार'ही मिळाला होता. विशेष म्हणजे गेल्या चार दशकांमधील सर्व विजेत्या कलाकृतींपैकी सर्वोत्कृष्ट असे नाव बुकरने या कादंबरीला दिले. 1993 मध्ये त्यांना 'बुकर ऑफ बुकर्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून रश्दी यांचा नेहमीच आदर केला जातो.

16 जून 2007 रोजी राणी एलिझाबेथ यांच्या वाढदिवशी त्यांना 'नाईट (सर)' ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. 'मिडनाइट्स चिल्ड्रन'नंतरही त्यांचे लेखन सुरूच राहिले आणि जगातील सर्वोत्तम लेखकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. 1988 मध्ये त्यांनी लिहिलेल्या कादंबरीने त्यांना पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणले; परंतु यावेळी कारण वेगळेच होते. इस्लामवर आधारित त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या त्यांच्या पुस्तकावर मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणावर टीका केली होती आणि इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी 1989 मध्ये त्यांना ठार मारण्याचा फतवा जारी केला. त्यांना मारण्यासाठी 3 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

न्यू यॉर्कमधील हल्ल्यानंतर रश्दी यांची प्रकृती आता सुधारत आहे आणि व्हेंटिलेटर काढून टाकले आहे, ही चांगली गोष्ट आहे. ते बोलूही लागले आहेत; परंतु त्यांच्यावर झालेला हल्ला मोठा होता. खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूसाठी फतवा काढल्यानंतर काही दिवसांत खोमेनी स्वतः दिवंगत झाले; परंतु त्यांचा फतवा जारीच राहिला. अर्थात हळूहळू त्या फतव्याची तीव्रता कमी झाली आणि लोक हळूहळू ही गोष्ट विसरून जाऊ लागले. अगदी अलीकडील एका मुलाखतीत रश्दी यांनी सांगितले होते की, 'मृत्यूच्या असंख्य धमक्यांच्या छायेखाली एवढी वर्षे काढल्यानंतर आता माझे जीवन सामान्य होऊ लागले आहे.' परंतु ही परिस्थिती कायम राहिली नाही आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाच.

प्रेमाप्रमाणेच द्वेषाची भावनासुद्धा लवकर द़ृष्टिआड होणारी नाही, हीच गोष्ट या हल्ल्यातून दिसून आली. द्वेष अनेकदा पिढ्यान् पिढ्या कायम राहिल्याचे आपण पाहतो. हल्ल्यानंतर कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट गटाचा या घटनेमागे हात असल्याचा दावा करता येत नाही; परंतु हल्लेखोराचे सोशल मीडिया पेज पाहिल्यावर तो शिया जहालवादी असल्याचे स्पष्ट झाले. असे हल्ले कायदा सुव्यवस्थेसाठी तर आव्हानात्मक असतातच; परंतु त्याहून अधिक ते मूल्यव्यवस्थेला आव्हानात्मक असतात. कट्टरता आणि द्वेषाचा प्रभाव किती गडद असतो, हे अशा हल्ल्यांमधून दिसून येते.

रश्दी यांचे 'द सॅटॅनिक व्हर्सेस' हे पुस्तक 1988 मध्ये प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकात प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. 1989 मध्ये प्रकाशनाच्या एका वर्षानंतर खोमेनी यांनी रश्दींविरुद्ध फतवा काढला आणि सुमारे दहा वर्षे रश्दींना अज्ञातवासात राहावे लागले. मात्र या काळात ब्रिटिश एजन्सींकडून त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली होती; परंतु रश्दी यांनी त्यांची गुप्त ठिकाणे सोडून 1990 च्या उत्तरार्धात बाहेर पडण्यास सुरुवात केली. रश्दी यांची हत्या करण्यास आपण पाठिंबा देणार नाही, असे 1998 मध्ये इराणने जाहीर केल्यानंतरच हे घडले. रश्दी यांच्यावर यानंतर अनेक वर्षांनी झालेला हल्ला जेवढा गंभीर आहे, तेवढाच तो प्रश्न निर्माण करणारा आहे. इतक्या वर्षांनंतर द्वेषाचा अंगार का विझू शकत नाही, हा तो प्रश्न असून, याबद्दल सर्वचजण विचार करण्यास बांधिल आहे. आजमितीस केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे लेखकच या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुढे आले आहेत. तथापि, बर्‍याच अपेक्षित प्रतिक्रिया आल्या नाहीत आणि हे मौन अधिक त्रासदायक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news