

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खुजगाव व सिद्धेवाडी येथील दहा शेतकर्यांची 31 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी चार दलालांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेश सुभाष पाटील (रा. खुजगाव, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी रामा चौगुले, परमेश्वर चौगुले, अमित चव्हाण (रा.कवठेमहांकाळ) व अमोल पाटील (रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : संशयित दलालांनी फिर्यादी महेश याची गेल्या हंगामात द्राक्ष खरेदी केली होती. मात्र द्राक्ष नेल्यापासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. गेल्या काही दिवसांपासून या दलालांनी संपर्कच तोडला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, याच दलालांनी सन 2020 मध्ये सिद्धेवाडी येथील राजेंद्र पवार, अरविद दुबोले, पंडित पवार, शामराव चव्हाण, प्रकाश पवार, गुंडा चव्हाण, दिनकर चव्हाण व संतोष जाधव यांची द्राक्षे खरेदी केली होती. या शेतकर्यांंचेही पैसे दिलेले नाहीत. त्यांचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दरवर्षी द्राक्ष दलालांकडून द्राक्ष उत्पादकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजार समित्या आणि द्राक्ष बागायतदार संघाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.