

औरंगाबाद : अकरा वर्षांपूर्वी दोन हजार चौरस फूट भूखंडावर सुसज्ज घर बांधले. मात्र, उताराचा भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी यायचे. त्यामुळे वैतागलेल्या घर मालकाने मग अख्खे घरच जमिनीपासून उखडून चार फूट वर उचलले. हाऊस लिफ्टिंगचा हा अनोखा प्रयोग औरंगाबादच्या सातारा परिसरातील सत्कर्मनगरात झाला आहे. अशा प्रकारे जमिनीपासून संपूर्ण घर वर उचलण्याची ही औरंगाबादेतील किंबहुना मराठवाड्यातील पहिलीच घटना आहे.
सातारा परिसरातील सत्कर्मनगरातील आनंद कुलकर्णी यांनी हा प्रयोग केला आहे. कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत लेखाधिकार्याचे काम पाहतात. कुलकर्णी यांनी 2011 मध्ये सत्कर्मनगरात 2 हजार चौरस फूट भूखंडावर घर बांधले. कालांतराने बाजूच्या गल्लीतून जाणारा रस्ता उंच झाला. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षीच तेथून येणारे पाणी घरासमोर तुंबून ते घरात यायला लागले. बराच विचार केल्यानंतर कुलकर्णी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले घर वर उचलण्याचा निर्णय घेतला. हरियाणातील एजन्सीच्या मदतीने हे घर वर उचलण्यात आले आहे. 5 मे रोजी हे काम हाती घेण्यात आले. आता ते पूर्णत्वाला आले आहे.
कसे उचलले जाते घर?
ज्या घराला वर उचलायचे आहे, त्या घराच्या भिंतींच्या बाजूने आधी दोन दोन फूट खोदकाम करतात. बिम लागले, की मग खाली जॅक लावला जातो. त्यानंतर गाडी जशी वर उचलतात तसे हळूहळू या जॅकने घर वर उचलले जाते. पिलरच्या घरांना तसेच लोडबेअरिंगच्या घरांनाही हे शक्य आहे. परदेशात या पद्धतीचा वापर बर्याच वर्षांपासून होतो आहे.
हाऊस लिफ्टिंगचा खर्च किती?
नवीन घर बांधायचे तर प्रतिचौरस फुटाचा खर्च हा दीड हजाराच्या वर आहे. त्यापेक्षा आहे त्या स्थितीत घर वर उचलणे कमी खर्चाचे आहे. यासाठी प्रतिचौरस फुटाचा खर्च हा सरासरी 230 रुपये इतका आल्याचे आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हे घर पाडून नवीन बांधणे खर्चीक होते. यू-ट्यूबवर सर्च केले, तेव्हा हरियाणात काहीजण घर जॅकच्या साह्याने उचलून देत असल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी लगेचच काम सुरू केले.
– आनंद कुलकर्णी, घर मालक