देशभरात 21 बोगस क्रीडा संघटना

देशभरात 21 बोगस क्रीडा संघटना
Published on
Updated on

नगर ; अलताफ कडकाले : राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि देशासाठी पदके जिंकणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा लढाऊ खेळाडूंच्या उत्साह आणि कलागुणांना वाव देण्याच्या नावाखाली कार्यरत असलेल्या बनावट संघटनांची यादी लांबत चालली आहे. खेळाडूंच्या भवितव्याशी खेळणार्‍या अशा क्रीडा संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केली आहे.

'आयओए'ने क्रीडा मंत्रालयाला 21 बनावट क्रीडा महासंघांची यादी पाठविली आहे. या सर्व बनावट संघटनांवर लवकरात लवकर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना लिहिले आहे. त्याचबरोबर खेळाडूंना या संघटनांपासून दूर ठेवण्यासाठी जागरूक करण्याची मागणीही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे म्हणणे असे आहे की, संपूर्ण देशासह अनेक राज्यांत अशा संघटना सक्रिय आहेत. या संघटना ऑलिम्पिक नावाचा गैरवापर करून विविध स्पर्धा भरवून खेळाडूंची फसवणूक करून त्यांच्याकडून पैशाची लूट करत आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे फसवणुकीची अनेक प्रकरणे आणि तक्रारी आल्या आहेत.

गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी

त्या संघटनांमार्फत खेळाडूंची फसवणूक केल्याच्या तक्रारी देशाच्या विविध भागांतून आल्याची माहितीही ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे. ग्रामीण भागातील खेळाडू पैसे भरून स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जातात. अशा बनावट क्रीडा संस्था प्रवेश शुल्काच्या नावाखाली भरमसाठ फी आकारतात, तर त्यांच्या पदकांना आणि प्रमाणपत्रांना काहीच किंमत नसते. त्याचा वाढीव गुण मिळण्यासाठी खेळाडूंना काहीही उपयोग होत नाही.

निशाण्यावर नवोदित खेळाडू

बनावट क्रीडा महासंघ नवोदित खेळाडूंना लक्ष्य करतात. असे खेळाडू शाळा आणि मैदानात दिसून येतात. बनावट क्रीडा संघटनांशी संबंधित अधिकारी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या नावाखाली त्यांची दिशाभूल करतात. या फसवणुकीची माहिती नसलेले खेळाडूही खेळायला जातात. मात्र, नंतर त्यांना मिळालेल्या प्रमाणपत्राला कोणतीच मान्यता नसल्याचे समजते.

या आहेत बनावट क्रीडा संघटना…

भारतीय महिला ऑलिम्पिक संघटना, ग्रामीण ऑलिम्पिक संघटना भारत, भारतीय ग्रामीण ऑलिम्पिक संघटना, विद्यार्थी ऑलिम्पिक संघटना, भारत, भारतीय शालेय ऑलिम्पिक संघटना, भारतीय ग्रामीण खेळ महासंघ, भारतीय ग्रामीण खेळ संघटना या 21 बनावट क्रीडा संघटनांपैकी ऑलिम्पिकने ओळखल्या आहेत.

रूरल गेम्स असोसिएशन ऑफ इंडिया, नॅशनल स्कूल स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया, शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम फेडरेशन-इंडिया, नॅशनल स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया, नॅशनल स्पोर्टस् ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, यूथ गेम्स फेडरेशन इंडिया, यूथ स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया, यूथ स्पोर्टस् डेव्हलपमेंट फाऊंडेशन, द असोसिएशन फॉर ट्रेडिशनल यूथ गेम्स अँड स्पोर्टस् इंडिया, साल्वो स्पोर्टस् आणि गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट गेम्स अँड स्पोर्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, स्टुडंट गेम्स अँड स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट गेम्स अँड अ‍ॅक्टिव्हिटीज फेडरेशन आणि स्टुडंट गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचेही पत्र

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशने एक पत्र काढून 'ऑलिम्पिक' या शब्दाच्या वापराबाबत संबंधित संघटनांच्या पदाधिकार्‍यांना सक्‍त सूचना दिली आहे. पत्रात म्हटले की, या संघटना स्कूल ऑलिम्पिक, रूरल ऑलिम्पिक, स्टुडंट ऑलिम्पिक अशा विविध नावाने, तसेच बोधचिन्हाचा गैरवापर करून स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामधून अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे संबंधित संघटनांनी 'ऑलिम्पिक' शब्दाचा वापर परवानगी विना केल्यास संबंधित संघटनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news