देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबरी पाडताना सेनेचा एकही नेता हजर नव्हता

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबरी पाडताना सेनेचा एकही नेता हजर नव्हता
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : येथे मशिदींवरील भोंगे काढा म्हटले, तर तुमची हिंमत होत नाही आणि बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेता. बाबरी जेव्हा पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता. बाबरी पाडल्याप्रकरणी ज्या 32 नेत्यांवर गुन्हे दाखल झाले, ते सर्वजण भाजप आणि संघ परिवारातील होते, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला. त्याचवेळी येणार्‍या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची भ्रष्टाचारी सत्ता उलथवून टाकण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले.

सायन येथील सोमय्या मैदानावर 1 मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भाजपने 'बूस्टर डोस' सभा घेतली. या सभेतून भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांना मी म्हणजे महाराष्ट्र आणि मी म्हणजे मुंबई आणि मराठी, असे वाटते; पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी नाही. उलट तुम्ही मराठी माणसाला लुटण्याचे काम केले. तुम्ही म्हणजे हिंदुत्वही नाही. ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार, दुराचार करता, तुमचे मंत्री घोटाळे करून तुरुंगात जातात, तेव्हा देशात महाराष्ट्राची मान शरमेने झुकते, असा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

हे रावणाचे राज्य आहे का?

राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या दारात हनुमान चालिसा म्हनणार म्हणून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणे, हा सरकार उलथविण्याचा प्रयत्न होता; पण हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथून जाईल की रावणाचे? असा सवाल करताना फडणवीस यांनी, हे रावणाचे राज्य आल्याचा घणाघात केला.

राज्यात अघोषित आणीबाणी आहे. सरकार विरुद्ध बोलणारे पत्रकार आणि विरोधकांवर हल्ले होत आहेत; पण आम्ही घाबरणारे नाही. इंदिरा गांधी यांच्या मुस्कटदाबीला घाबरलो नाही; तर तुम्हाला काय घाबरणार. अंगावर आल्यास जशाच तसे उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य सरकारने कोरोना काळात बिल्डर आणि बारमालकांनाच सवलती दिल्या. स्टॅम्प ड्युटी, परदेशी दारूवरील कर कमी केला. बारचे परवाना शुल्क कमी केले; पण राज्यातील सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला नाही. भाजपशासित राज्यांनी केला तसा पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केला नाही. आता त्यांचा बुरखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टराटरा फाडल्यावर त्यांना झोंबले. गेल्यावर्षी केंद्र सरकारने महाराष्ट्राला 40 हजार कोटींचा व्हॅट परतावा दिला. यंदा 26 हजार कोटींचे देणे असताना 13 हजार कोटी रुपये दिले आहेत. आणखी 13 हजार कोटी ऑगस्टपर्यंत मिळणार असताना केंद्राच्या नावाने खापर का फोडता? असा सवाल फडणवीस यांनी केला.

आता ती शिवसेना राहिली नाही

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती मुंबई दिली होती. त्यांच्या हाती मुंबई सुरक्षित होती; पण आज सामान्य मुंबईकरांना लुबाडले जात आहे. आता ती शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत ही मुंबई पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या हाती दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि प्रवक्त्यांच्या बैठकीत विरोधकांवर तुटून पडण्याचे आदेश दिले होते. त्याचा समाचार घेताना, उद्धव ठाकरे यांना तुटून पडा; पण लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही, असा इशारा दिला. पोलिसांच्या बळावर हल्ले काय करता? आम्ही घाबरणार नाही. तुटून पडण्याची खुमखुमी आहे; तर भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर तुटून पडण्याचे आव्हान देत, फडणवीस यांनी कविता सादर करीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

इफ्तार पार्ट्यांनी रोजगाराचे प्रश्न सुटणार का? : पवारांना टोला

शरद पवार म्हणतात की, हनुमान चालिसा म्हटल्याने रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का? मग इफ्तार पार्ट्या झोडल्याने हे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. रोजगार निर्माण होण्यासाठी राज्यात गुंतवणूक यायला हवी; पण आज राज्य लोडशेडिंगमुळे अंधारात चालले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राची गुंतवणुकीच्या बाबतीत पीछेहाट सुरू आहे. आमच्या काळात पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आज मागे पडले आहे. मग रोजगार कसे येणार, असे फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news