देवेंद्र फडणवीस : मुंबईकर मराठी माणसाला लुटून खाणारे मराठी माणसाचे दैवत कसे ठरतात?

File Photo
File Photo
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यांची मालिकाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत वाचून दाखवली. मुंबई महापालिकेतील कोणतीही निविदा असो की जम्बो कोविड सेंटर असो, सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, मुंबईकर मेले तरी चालतील पण आपले घर भरण्याचे काम पालिकेतील सत्ताधार्‍यांनी केले आहे. त्यावर आम्ही बोललो तर मराठी माणसाचे शत्रू ठरतो, मात्र मुंबईकर आणि मराठी माणसाला लुटून खाणारे मराठी माणसाचे दैवत कसे काय ठरतात? असा घणाघाती सवाल फडणवीस यांनी केला.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील कायदा – सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील कारभाराची लक्‍तरे सभागृहात टांगली.

बोगस कंपन्यांना कोरोनाची कामे

कोरोना महामारीत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार घडले. आपल्याच पदाधिकार्‍यांच्या बोगस कंपन्यांना जम्बो कोविड सेंटरची कामे कोणताही अनुभव नसताना देण्यात आली. लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला पुण्यात शिवाजी नगर जम्बो कोविड सेंटरचे काम देण्यात आले. या कंपनीचा कारभार लक्षात आल्यानंतर तिला काळ्या यादीत टाकण्यात आले व 15 दिवसांत काम काढून घेण्यात आले. पुढे त्याच कंपनीला मुंबईत पाच कोविड सेंटरची कामे मात्र देण्यात आली. ऑक्सीजन प्रकल्पांसाठी काम दिलेल्या तिन्ही कंपन्या काळ्या यादीतील होत्या, असा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी केला.

पेंग्विनवाल्यांना ऑक्सिजनचे काम

पेंग्विन आणि पिंजरे पुरविणार्‍या हायवे कंपनीवर कृपा दाखवित ऑक्सिजन निर्मितीचे काम देण्यात आले. या कंपनीकडे स्वतः चा साधा जीएसटी नंबरही नाही. एका डिपार्टमेंटल स्टोअरचा जीएसटी नंबर त्यांनी दिला होता, असे सांगून फडणवीस म्हणाले, मुलुंड कोविड सेंटरचे काम ज्या आशा कॅन्सर ट्रस्ट आणि रिसर्च सेंटरला दिले ही कंपनी किंवा संस्था कोठेही रजिस्टर नाही.

मुंबईच्या आरोग्याशी खेळ

निविदेतील गोंधळामुळे मुंबईकारांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम सुरू आहे. विविध इंजेक्शन, गोळ्या, सिरप, आधी आवश्यक औषधांच्या खरेदीच्या फाईली क्लिअर न केल्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. 73 औषधांच्या खरेदीची फाईल मे 2020 ला महापौर कार्यालयात गेली. मात्र त्यावर वजन ठेवावे म्हणून ही फाईल दाबून ठेवण्यात आली. 18 स्मरण पत्रे पाठवूनही ती क्लिअर झाली नाही. त्यानंतर ती गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिकेत अक्षरशः लूट सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

बिल्डरांना मलिदा

अजमेरा बिल्डरला कोट्यवधी रुपयांचा मलिदा देण्यात आला याचा उलगडा फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केला. अजमेरा बिल्डरने 2 कोटी 55 लाखाला विकत घेतलेला सीआरझेड मधील भूखंड महापालिकेने पंपिंग स्टेशनसाठी घेतला. या भूखंडावर या बिल्डरला कोणतेही बांधकाम करता येत नव्हते. तरीही या भूखंडाच्या बदल्यात अजमेरा बिल्डरला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आधीच्या आयुक्तांचा आदेश डावलून 349 कोटी रुपये देण्यात आले. सामान्य माणसाने बिल भरली नाहीत तर त्याच्यावर कारवाई होते. पण मुंबईतील बिल्डर्सकडे 2 हजार 300 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यावर महापालिका कारवाई करत नाही, असे फडणवीस म्हणाले.

एसटीपी प्रकल्पातही घोटाळा

समुद्रात सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुंबई महापालिका एसटीपी प्रकल्प राबवित आहे. भारतात सर्वत्र त्यासाठी प्रति दशलक्ष लिटरसाठी सरासरी 1 कोटी 70 लाख रुपये खर्च येतो. मात्र मुंबई महापालिकेने तब्बल 7 कोटी 47 लाख रुपयांची निविदा स्वीकारली आहे. हा 25 हजार कोटींचा घोटाळा असून याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे आणि सुप्रीम कोर्टच या निविदा प्रक्रियांवर देखरेख ठेवणार आहे. त्यावर आपलीही नजर आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

यशवंत जाधवांकडे 300 कोटींचे घबाड

मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सुरुवातीला 130 कोटींची संपत्ती सापडली. आता ती 300 कोटीपर्यंत गेली आहे. त्यांनी दोन वर्षात 30 मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे. कोरोनाने लोक मरत होते तेंव्हा त्यांनी ही लूट केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजपला पोटदुखी – आदित्य ठाकरे

रोज उठून टीका करणे ही भाजपाची सवय आहे. मुंबईकरांसाठी दिलासा देणार्‍या घोषणा सरकारने केल्या म्हणून भाजपच्या पोटात दुखले असल्याने फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली असावी, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. सभागृहात सरकारने अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केले. मुंबई महानगर पालिकेने कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचे जगभरातून कौतुक झाले. अशा वेळी विरोधी पक्ष राजकारण करत होता असा टोला ठाकरे यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news