दुहेरी भूमिकेतील आई, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

अपर्णा किल्लेदार : अनेकदा पती नोकरीनिमित्त दुसर्‍या गावी असल्याने महिलांना मुलांचा सांभाळ करताना आई आणि वडील अशा दुहेरी भूमिका साकाराव्या लागतात. अशी वेळ आपल्यावरही आली असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

म्हटलं तर अमिता एक गृहिणी होती; पण तिच्यावर इतक्या जबाबदार्‍या होत्या की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिला जराही वेळ मिळत नसे. सकाळी मुलाला तयार करून ती त्याला शाळेत सोडण्यासाठी निघाली त्यावेळी आज मेटेंनन्सचा चेक द्यायचा आहे, हे तिच्या लक्षात आलं. चेकबुक तर संपलं आहे, आता ते मागवावं लागेल, ही गोष्ट तिच्या लक्षात आली.

ती घरी आली, तर घरातील नळ लीक झाला होता. प्लंबरने वॉशर नवीन आणावा लागेल म्हणून सांगितलं. मुलगा शाळेतून आला त्यावेळी उद्या सुट्टी असल्याने आज जेवायला बाहेरच जाऊ असा हट्ट त्याने धरला. मुलाचे रोज काही ना काही हट्ट असतात. कधी त्याला एखादी गोष्ट खरेदी करायची असते, कधी मित्राच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट घ्यायचं असतं, तर कधी पार्टीला जायचं असतं. इतर मित्र जातात तसंच त्याला पार्टीला जायचं असतं. अमिता त्याला नाही म्हणू शकत नसे.

अमिताचा पती गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत नोकरी करतो आणि इथं ती एकटी घर सांभाळते. पती वर्षातून चार-पाच वेळा तिला भेटण्यासाठी येतो. त्यावेळी अमिता इतकी व्यस्त असते की, ती त्याच्याकडे घरातील अडचणी, मुलाचा हट्टीपणा सांगू शकत नाही. वडील घरी नसल्याने मुलगा अस्वस्थ असल्याने असा हट्टीपणा करत असेल, असं अमिताला वाटतं.

सध्याच्या काळात पती नोकरीसाठी दुसर्‍या शहरात आणि घर आणि मुलं सांभाळण्याचं काम एकट्या स्त्रियांकडे असं चित्र बर्‍याच ठिकाणी दिसतं. अनेकदा पती आपल्याच शहरात राहत असला, तरी तो इतका व्यस्त असतो की, त्याला अनेक दिवस आपलं मुल भेटूही शकत नाही. अशा परिस्थितीत शाळा आणि घर अशा दोन्ही ठिकाणी आईच मुलांची पालक असते. अशा परिस्थितीत आई जेव्हा वडिलांची भूमिका निभावू लागते तेव्हा मुलांना ते आवडत नाही. ते तिचं ऐकत नाहीत. वडिलांना देण्यात येणारा मान ते आईला देत नाहीत. अनेकदा जी व्यक्ती पैसे मिळवून घर चालवते ते आपले वडील अशी भावना मुलांच्या मनात असू शकते. वडील मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात.

आई मात्र, त्याने मागितलेल्या वस्तूच्या किमतीकडे अधिक लक्ष देते. वडिलांनी ज्या गोष्टी आणून देतो असं सांगितलेलं असतं, त्या गोष्टी ते आणून देतात. या उलट मुलाने सायकल मागितली असेल तर, तुला आता सायकलची गरज नाही, असं आई म्हणते. वडील जवळ नसतील तर आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका आईच पार पाडत असते. अशावेळी तिचं अशा प्रकारचं वागणं मुलांना आवडत नाही.

तुम्हीही अशा दुहेरी भूमिकेत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. मुलांना सारखं ओरडणं, त्यांना वस्तू देण्यात कंजुषी करणं या गोष्टी टाळा. मुलाला चांगले मार्क्स मिळाले तर पिकनिकला-गार्डनमध्ये घेऊन जाईन, असं तुम्ही सांगितलं असेल, तर त्याने चांगले गुण मिळवल्यानंतर त्यामध्ये टाळाटाळ करू नका. मुलांना बाहेर घेऊन गेलात तर त्याला मनमानी करू देऊ नका. तुमच्या ओरडण्याचा त्याच्यावर परिणाम झाला पाहिजे. तुमची मतं वारंवार बदलू नका. आपल्याला ही दुहेरी भूमिका सांभाळणं फार अवघड वाटत असेल; पण त्याकडे एक आव्हान म्हणून बघा.

मुलांना शाळेत घेऊन जात असाल, तर चांगल्या तयार होऊन जा. मुलांना शिक्षकांसमोर कधीही रागाऊ नका. मुलांसमोर डोळ्यातून अश्रू गाळणं आईने नेहमी टाळावं. तुम्ही असं केलंत, तर मुलं तुम्हाला वडिलांच्या रूपात पाहणार नाहीत. पती जवळ नसेल, तर घराची आणि मुलांची सुरक्षा हा अनेक स्त्रियांसाठी चिंतेचा विषय असतो. अशा स्थितीत आपल्या आसपास सपोर्ट सिस्टीम तयार करून ठेवावी. अडचणीच्या काळात आपल्याला मदत करू शकणार्‍या लोकांशी नेहमी संपर्क ठेवावा.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news