दहा वर्षांनी पुनरावृत्ती होणार काय?

दहा वर्षांनी पुनरावृत्ती होणार काय?
Published on
Updated on

समाजवादी पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला कडवी झुंज देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अलीकडेच कोलकात्यातील बैठकीत उत्तर प्रदेशात भाजपला 80 जागांवर पराभूत करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच सपला राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या संकल्पाचाही पुनरुच्चार त्यांनी केला. 2002 मध्ये समाजवादी पक्षाची पहिली बैठक कोलकात्यात झाली होती आणि 2003 मध्ये या पक्षाने उत्तर प्रदेशात सरकार स्थापन केले होते. आता दहा वर्षांनी याचीच पुनरावृत्ती होईल, अशी अखिलेश यांना आशा आहे. ती खरी ठरते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

समाजवादी पक्ष आता 2024 च्या राजकीय युद्धात उत्तर प्रदेशात भाजपचा विजयरथ रोखण्याच्या तयारीला लागला आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशात भाजपला सर्व 80 जागांवर पराभूत करण्याची इच्छा बोलून दाखविली. तसेच 'समाजवादी'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्याचा संकल्पही बोलून दाखविला. केंद्रीय संस्थांंचा भाजपकडून दुरपयोग होत असून, भाजपदेखील काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे, असा आरोपही अखिलेश यांनी केला. उत्तर प्रदेशात समाजवादीचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाने नव्या बूथवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. जेथे समाजवादी पक्षाला मते कमी मिळतात, तेथे अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षाकडून यासाठी त्रिस्तरीय रणनीती आखली जाणार आहे. अखिलेश यांनी स्पष्टच म्हटले की, यंदा समाजवादी अमेठी आणि रायबरेली येथून उमेदवार उभा करणार. कारण तेथे सपा कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि मतदारसंघांचा विकास होत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे या दोन व्हीआयपी जागांच्या समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यादव यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि बसपशी हातमिळवणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

कोलकाता येथे दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पक्षाला आणखी खंबीर करण्यासाठी सखोल विचारमंथन करण्यात आले. पक्षाने भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध रस्त्यापासून ते संसदेपर्यंत संघर्ष करण्याचा संकल्प केला. उत्तर प्रदेशात समाजवादी भाजपला पराभूत करण्यात यशस्वी ठरले, तर त्याचा थेट परिणाम दिल्लीवर नक्कीच होईल. अन्य प्रादेशिक पक्षदेखील समाजवादी पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. अशावेळी समाजवादी पक्षाला मध्यवर्ती भूमिका वठवायची आहे. कोलकाता येथील अधिवेशन आटोपल्यानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे 2024 च्या रणसंग्रामाच्या तयारीला कसे लागतील, यावर कार्यकारिणीच्या बैठकीत भर देण्यात आला. जेथे समाजवादीला कमी मते मिळतात, तेथे लक्ष केंद्रित करण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. यानुसार विविध क्षेत्रांत, भागांत पक्षाचा विस्तार करण्याची रणनीती आखण्यात आली. याप्रमाणे दर महिन्याला उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य जनता यात सहभागी होईल, यावर कटाक्ष असेल. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचे, रस्त्यावर उतरण्याचे ठरविण्यात आले. जातीवर आधारित जनगणनेची मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून केली जात असताना समाजवादीने अशी जनगणना करण्याची मागणी अगोदरच केलेली आहे; पण जातीवर आधारित जनगणनेपेक्षा घटनात्मक संस्थांचे दुर्लक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणार्‍या दुरपयोगाचा मुद्दा अधिक प्रकर्षाने मांडण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. महागाई, बेरोजगारी, सर्वसामान्यांचे होणारे शोषण यावरही संघर्ष केला जाणार आहे.

अखिलेश यांनी म्हटले आहे की, बूथ स्तरावर पक्ष मजबूत करण्यासह जातीनिहाय जनगणनेचा मुद्दाही मांडण्यात येणार आहे. या आधारावर सर्व जातींतील लोकांना विकासाची समान संधी मिळेल. समाजवादीकडून अति मागास गटाला जोडून घेण्यासाठी अभियान राबविले जाणार आहे. पक्षाच्या मते जी मंडळी पक्षापासून दूर गेली आहे, त्यांना पक्षाकडे पुन्हा ओढण्यासाठी प्रयत्न केले जातील. अखिलेश यांनी उत्तर प्रदेशात भाजपचा सुपडासाफ करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आजच्या घडीला महागाई आणि बेरोजगारीने कळस गाठला आहे. अशावेळी भाजपला हरविण्यासाठी समाजवादी संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरेल. ममता बॅनर्जी, केसीआर आणि नितीशकुमार हे विरोधकांची आघाडी करण्याचा प्रयत्न करत असून, दिल्लीकर मात्र स्वत:च भूमिका ठरवतील, असे अखिलेश यांनी नमूद केले.

भाजपला हरविण्याची क्षमता असलेल्या नेत्यांच्या घरी छापे घातले जात आहेत. पूर्वी हे काम काँग्रेसचे लोक करायचे आणि आता भाजप तोच मार्ग अवलंंबत आहेत, असा आरोप अखिलेश यांनी केला. कार्यकारिणीची बैठक होण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तेथे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षापासून चार हात लांब राहण्यावर एकमत झाले. ममता बॅनर्जी यांनी डाव्यांबरोबर काँग्रेसची वाढलेली जवळीक पाहता नाराजी व्यक्त केली. बंगालमध्ये अलीकडेच विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने डाव्यांच्या मदतीने एक जागा जिंकली. त्याचवेळी ममता यांना बंगालमधील भाजपच्या विरोधी मतांत पडणार्‍या फुटीवरून फारशी चिंता नाही. दरम्यान, समाजवादीच्या बैठकीत सात वर्षांनंतर सामील झालेल्या शिवपाल यादव यांनी भावनिक भाषण केले. ते म्हणाले, सात वर्षांनंतर पक्षाच्या बैठकीत सहभागी झालो आहे. आता उर्वरित आयुष्य पक्षासाठी वाहणार आहे. आपण ठरविले, तर लोकसभेला भाजपला चांगली लढत देऊ शकतो, असेही शिवपाल यादव म्हणाले. अमेठी आणि रायबरेली येथून समाजवादीचा उमेदवार उभा करण्याचे संकेत अखिलेश यांनी दिले आहेत. त्यांनी म्हटले की, पक्ष या दोन्ही जागांवर आपला उमेदवार उभा करण्यास सकारात्मक आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अमेठी दौर्‍यातही असेच संकेत दिले होते. ते म्हणाले, अमेठी आणि रायबरेली हे व्हीआयपी मतदारसंघ असूनही तेथे जनतेचे प्रश्न कायम असल्याचे दिसून येते. यापूर्वी समाजवादीने या दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे टाळले आहे. त्याबदल्यात काँग्रेसनेदेखील करहल आणि मैनपुरी येथे उमेदवार उभे केले नव्हते. आता दोन्ही ठिकाणी समाजवादी पक्ष उतरत असेल, तर राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमेठीत आगामी निवडणूक प्रियांका गांधी आणि रायबरेलीतून राहुल गांधी लढण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि रायबरेलीत रंजक लढत पाहावयास मिळेल.

– अमित शुक्ल, राजकीय अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news