

जोधपूर : राजस्थानमध्ये अनेक सुंदर महाल, राजवाडे पाहायला मिळतात. तेथील एक महाल तर अक्षरशः थक्क करणाराच आहे. सोन्याच्या झळाळीने चमकणार्या भिंती आणि छत, त्यावर सुंदर कोरीव काम, सजीव दिसणारी चित्रकला आणि रंगीबेरंगी काचांचा संगम. हा आहे जोधपूर येथील मेहरानगडचा फूल महाल. मेहरानगडच नाही तर संपूर्ण राजस्थानचा सर्वात सुंदर महाल म्हणून तो प्रसिद्ध आहे. हे अद्भुत सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी यामध्ये 10 किलो सोन्याचा वापर करण्यात आला होता.
18 व्या शतकाच्या मध्यात कलावंतांनी 4 वर्षे राजवैभवाचे नवे परिमाण रचले. इथे भिंतींवर राग-रागिणींची 36 सजीव वाटणारी चित्रे, महाराजा तख्तसिंह आणि त्यांच्या 9 राजकुमारांचे चित्र, देवी-देवतांची चित्रे तथा भगवान श्रीनाथ व शिव-पार्वतीची पेंटिंग आहे. छतावर लाकडावर फुलांचे सुंदर नक्षीकाम व गोल्ड वर्कचे काम, त्यामागील चकाकणारा आरसा आकर्षित करतो. 10 पेक्षा अधिक स्तंभांवरही फुलांच्या आकृती सोन्याने मढवल्या आहेत.