

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 8 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे. प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रांची योग्य माहिती घेऊन अर्ज करण्याचे आवाहन डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
बारावीची परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विषय घेऊन उत्तीर्ण होणार्या तसेच आयटीआय उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करायची असल्यास त्याचा पर्याय देण्यात आला आहे. कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य होत नसल्यास अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या 'पॉलिटेक्निक'मध्ये सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करायची आहे.
या सुविधा केंद्रांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना तारीख व वेळ ठरवून दिले जाईल. त्यानुसार अर्ज निश्चिती करावी लागेल. डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणीच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे 31 मार्च 2023 पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रमाणपत्र सादर करू न शकणार्या विद्यार्थ्यांना राखीव जागांवर दावा करता येणार नाही, असे देखील डॉ. वाघ यांनी स्पष्ट केले आहे.