

लंडन : पृथ्वीला झालेल्या एका लघुग्रहाच्या धडकेनंतर डायनासोरचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले होते. या धडकेनंतर दीर्घ मुदतीचा हिवाळा निर्माण झाल्याचेही म्हटले जाते. मात्र, आता संशोधकांनी म्हटले आहे की या धडकेने अशा हिवाळ्याला चालना दिली नव्हती. त्यामुळे लघुग्रहाच्या त्या धडकेनंतर पृथ्वीवर नेमके काय घडले याबाबतचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
तब्बल 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीच्या एका वसंत ऋतूत दहा किलोमीटर रुंदीचा एक लघुग्रह युकाटन पेनिन्सुलामध्ये धडकला आणि त्याचे पृथ्वीवर दूरगामी परिणाम झाले. या घटनेला 'चिक्सलब इम्पॅक्ट' असे म्हटले जाते. या धडकेमुळे पृथ्वीवरील जीवांच्या 75 टक्के प्रजाती नष्ट झाल्या. त्यामध्ये उड्डाण करू न शकणार्या सर्व डायनासोर प्रजातींचा समावेश होता. मात्र, या डायनासोरचा नेमका र्हास कसा झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
अनेक दशकांपासून संशोधकांची अशी धारणा होती की या धडकेनंतर इतकी धूळ वातावरणात उडाली की त्यामुळे एखाद्या 'आण्विक' कारणांमुळे निर्माण होणार्या हिवाळ्यासारखाच दीर्घ मुदतीचा हिवाळा निर्माण झाला. मात्र, आता याबाबत झालेल्या नव्या संशोधनात असा दीर्घ हिवाळा निर्माण झाला नव्हता असे आढळून आले. त्याची माहिती 'जियोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नेदरलँडस्मधील युट्रेच युनिव्हर्सिटीच्या लॉरेन ओकोन्नोर यांनी सांगितले की असा 'न्यूक्लियर विंटर' निर्माण झाला नव्हता याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत.