तापमानवाढीने धोक्याचा इशारा

तापमानवाढीने धोक्याचा इशारा
Published on
Updated on

हवामानात बदलांची कारणे जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

मार्च महिन्यातील उष्म्याने 121 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. हवामानशास्त्र खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमध्येही अशीच परिस्थिती राहील आणि तुम्हा-आम्हाला उष्म्यापासून सुटका मिळणार नाही. भारतात मार्च ते जून हा कालावधी उन्हाळ्याचा मानला जातो. परंतु मे महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र असतात. सरासरी तापमानापेक्षा 4.5 अंश अधिक तापमान असण्याच्या स्थितीला उन्हाच्या झळा किंवा उष्णतेची लाट म्हटले जाते.

तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा 6.4 अंशांनी अधिक असेल, तर ती गंभीर लाट मानली जाते. परंतु हवामानशास्त्र खात्याकडून यावर्षी पहिली उष्णतेची लाट मार्च महिन्यातच नोंदविली गेली. तेव्हापासून आतापर्यंत अशी स्थिती दहा-बारा वेळा येऊन गेली आहे आणि हे अत्यंत गंभीर आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उन्हाच्या झळांमुळे जंगलात आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. बद्रीनाथ धाम परिसरातील बर्फ वेळेच्या कितीतरी आधीच वेगाने वितळू लागला आहे.

हवामानात झालेला हा बदल केवळ भारतापुरताच सीमित आहे, असे नाही. अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या ध्रुवीय प्रदेशांवरही उष्णतेच्या लाटेसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तेथील तापमान 30 ते 47 अंशांपर्यंत नोंदविले जात आहे. कुवेतच्या बाबतीत तर असे म्हटले जात आहे की, काही वर्षांनी हा संपूर्ण देशच मानवास वास्तव्य करण्यायोग्य राहणार नाही. कारण तेथील तापमान 50 अंशांच्या आसपास पोहोचले आहे.

समुद्रदेखील वाढत्या तापमानापासून दूर राहू शकत नाहीत. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे सातत्याने अवलोकन करणार्‍या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, 1982 पासून 2020 पर्यंत या सागरी प्रदेशात 150 पेक्षा अधिक वेळा उष्णतेच्या लाटेचा अनुभव आला. गेल्या 38 वर्षांच्या कालावधीत हिंदी महासागरात उष्णतेची लाट येण्याच्या घटना चौपटीने वाढल्या आहेत; तर बंगालच्या उपसागरात या घटना तिप्पट वाढल्या आहेत, ही खरी चिंतेची बाब आहे.

हवामानात वेगाने होत असलेले हे बदल जलवायू परिवर्तनाचा परिणाम होत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. धोका आपल्या अगदी जवळ आल्याचे संकेत परिस्थिती आपल्याला देत आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या द़ृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही.

आरोग्यापासून शेती आणि अर्थव्यवस्थेपर्यंत काहीही या परिस्थितीच्या परिणामांपासून वाचू शकणार नाही. सरासरीपेक्षा अधिक तापमान हा आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. भारत सरकारचे राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र तापमान आणि मृत्यू यांच्यातील संबंधांचा शोध घेण्यासाठी सातत्याने विश्लेषण करीत आहे. या विषयाकडे आणखी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जर वाढते तापमान आणि मृतांची संख्या यात काही विशिष्ट पॅटर्न दिसून आला, तर आपल्याला अनेक मृत्यू रोखता येतील.

वाढते तापमान आणि उष्णतेची लाट फळे आणि अन्नधान्याच्या उत्पादनावरही थेट परिणाम करू शकते. यावर्षी मार्चपासूनच येत असलेल्या उष्णतेच्या लाटांचा परिणाम आंबे आणि लिची या फळांच्या उत्पादनावर दिसून येण्याची शक्यता आहे. जसजशा या नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता वाढत जाईल, तसतसा आपल्या कृषी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होईल. भारतासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे कारण आपली 70 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शेतीशी जोडलेली आहे. उत्पादन घटले तर महागाई वाढेल. हवामानात होत असलेल्या मोठ्या बदलांची कारणे जागतिक आहेत. त्यावर भारताचे नियंत्रण नाही.

स्थानिक पातळीवर या बदलांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात. परंतु त्यावर गांभीर्याने विचारविनिमय करण्याबरोबरच तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हिरवाई वाढवून, पाण्याचा अपव्यय आणि मातीची धूप रोखून या दुष्परिणामांपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. आज देशातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जितक्या वेगाने खराब होत चालला आहे, तितक्या वेगाने कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे वृक्षाच्छादन वाढताना दिसत नाही. सर्वांत गंभीर चिंतेचा विषय म्हणजे भारताचे फुप्फुस मानले जाणारे ईशान्य हिमालयातील वनाच्छादन कमी होत चालले आहे.

प्रदूषणाचा विचार करता, जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांपैकी 22 भारतातील आहेत. एकदा हवेत सोडलेला कार्बन किमान दोनशे वर्षे वातावरणात तसाच राहतो. नैसर्गिक तेल, कोळसा आणि गॅसच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वातावरणात होते. जागतिक तापमानवाढीचे हेच मूलभूत कारण आहे. विविध कारणांसाठी केलेली जंगलतोड ही आता आपल्या मुळावर आली आहे. प्रगतीच्या पायर्‍या चढण्यासाठी आपण इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा विचार करतो.

तसेच शहरांच्या जवळपासची खेडीही आता शहरात समाविष्ट होऊ लागली आहेत. यामुळे जमीन वापरात मोठे बदल होत असून, या बदलांचाही परिणाम वातावरणावर होत आहे. सिमेंटीकरण आणि जमीन वापरातील बदल यामुळे तापमानवाढीला अधिकच चालना मिळाली आहे. याखेरीज इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जनही तापमानवाढीस कारणीभूत ठरले आहे. हानिकारक वायूंचा वापर अनेक क्षेत्रांमधील उत्पादन प्रक्रियेत केला जातो. त्यामुळे वातावरणाचा नूर पालटून तापमानवाढीचे संकट ओढावले आहे आणि येथून पुढील काळात हे संकट वाढतच जाणार आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

2019 मध्ये ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञांनी इशारा देताना असे म्हटले होते की, पुढील पाच वर्षे ही गेल्या 150 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक उष्ण राहणार आहेत. वातावरणाविषयी जी पूर्वानुमाने जाहीर झालेली आहेत, त्यानुसार जगाच्या तापमानात वेगाने वाढ होणार आहे. जागतिक तापमानात सरासरी 1.5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वास्तविक, गेल्या काही दशकांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसताहेत. याचा अर्थ असा की, शेकडो वर्षांपासून पृथ्वीचे जे सरासरी तापमान होते, त्यात बदल होतो आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान सध्या 15 अंश सेल्सिअस आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये तापमानात बदल होत आहेत.

त्यामुळे उन्हाळ्याचा काळ वाढतो आहे आणि हिवाळ्याचा काळ लहान होत चालला आहे. पर्यावरणवादी आणि वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वी 2 अंश तापमान वाढ सहन करू शकेलही. पण 2 अंश तापमानाची वृद्धी खूप भयानक आणि विध्वसंक आपत्तींना जन्म देऊ शकते. इतकी वाढ झाल्यास काही देश समुद्राच्या पोटात गायब होतील, तर काही देशांचे मोठे भाग तसेच काही देशांचा लहानसा भाग समुद्राच्या पोटात सामावेल.

आज पृथ्वीच्या तापमानात केवळ 0.7 टक्क्यांची वाढ झाली आहे; तरीही आपल्याला इतक्या नैसर्गिक आपत्तींना तोड द्यावे लागत आहे. अशा वेळी जर दोन अंशांनी तापमान वाढल्यास काय स्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! तापमान वाढ आणि हवामान बदलांच्या तडाख्यातून शेती जगवताना तापमानवाढीला प्रतिरोध करू शकणारे बियाणे शोधायला हवेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवे संशोधन करायला हवे. नव्या प्रजाती शोधायला हव्यात. पण या सर्वांना होणारा उशीर ही आज खूप मोठी चिंतेची बाब आहे. हा उशीर का होतोय? कारण भविष्यातील या संकटाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत.

आता मात्र धोक्याची घंटा वाजू लागली आहे, त्यामुळे या प्रश्नाप्रती असलेला निष्काळजीपणा तत्काळ सोडून देण्याची आणि पर्यावरण रक्षणाबाबत संवेदनशील नव्हे, तर कृतिशील होण्याची गरज आहे. बांगलादेश, इस्राईलसह जगातील अनेक देशांमध्ये काही प्रयोग सुरू आहेत. भारताच्या संदर्भाने त्याचे गांभीर्याने अध्ययन व्हायला पाहिजे. जगभरातील तज्ज्ञांना एकत्र आणून चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. पुढील 25 ते 50 वर्षांसाठी आपल्याला लढाईसाठी तयार व्हायचे असल्यास प्रामाणिक प्रयत्नच कामी येतील.

राजीव मुळ्ये, पर्यावरणतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news