

सिडनी : जगभरातून अनेक प्रकारच्या अनोख्या लग्नांचे वृत्त येत असते. आता ऑस्ट्रेलियातून असेच एक वृत्त आले आहे. तेथील पॅट्रिसिया क्रिस्टिन या तरुणीने स्वतःशीच थाटामाटात लग्न केले!
सिडनीत राहणार्या 28 वर्षे वयाच्या या तरुणीने पै-पाहुण्यांना निमंत्रित करून थाटामाटात स्वतःशीच लग्न केले. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या या तरुणीचा आठ वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता व मोडला होता.
त्यामुळे हे दुःख गोंजारत बसण्याऐवजी आपण स्वतःशीच लग्न करून स्वतःच्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा निर्णय तिने घेतला. तिने लग्नाच्या पत्रिका छापल्या व आप्तेष्ट, इष्टमित्रांमध्ये वाटल्या. स्वतःसाठी एक सुंदर वेडिंग गाऊन बनवून घेतला आणि हिर्याची एक सुंदर अंगठीही खरेदी केली.
तसेच लग्नानंतरच्या मेजवानीचा सुंदर बेतही केला. आधी निमंत्रितांना या लग्नात 'नवरदेव' असणार नाही हे माहिती नव्हते. त्यामुळे त्यांच्या नजरा या सुंदर विवाह समारंभातील 'नवरदेव' शोधण्यासाठी लागल्या होत्या. मात्र, नंतर त्यांना समजले की लग्नात वधू एकटीच आहे! तिने स्वतःच स्वतःला हिर्यांची अंगठी घातली आणि स्वतःशी लग्न केले.