…तर गोवा विधानसभा निवडणुकीत 37.50 टक्के ’फॅमिलीराज’

…तर गोवा विधानसभा निवडणुकीत 37.50 टक्के ’फॅमिलीराज’
Published on
Updated on

पणजी ; पिनाक कल्लोळी : 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 15 उमेदवार हे विधानसभेत कुटुंबशाही प्रस्थापित करू शकतात. हे सर्व उमेदवार निवडून आल्यास विधानसभेत 37.50 टक्के 'फॅमिलीराज' आकाराला येऊ शकते. 2017 च्या तुलनेत ही टक्केवारी 17.50 टक्क्यांनी वाढू शकते. सध्या या 15 पैकी 14 जणांना उमेदवारी जाहीर झाली असून आणखी एकाला लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

जिंकून येण्याची क्षमता असे कारण पक्षांकडून दिले जात असले तरी त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घराणेशाही डोळ्यात भरेल अशी वाढणार आहे.

यंदा भाजपने पणजीमधून बाबूश मोन्सेरात आणि ताळगावमधून त्यांच्या पत्नी जेनिफर यांना उमेदवारी दिली आहे. वाळपईमधून विश्वजित राणे आणि पर्येतून त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या रिंगणात आहेत. काँग्रेसने कलंगुटमधून मायकल लोबो आणि शिवोलीमधून त्यांच्या पत्नी डिलायला या दाम्पत्याला उमेदवारी दिली. भाजपने बाबू कवळेकर यांना केपेतून उमेदवारी दिली असली तरी त्यांच्या पत्नीला सांगेतून उमेदवारी नाकारल्याने त्या अपक्ष उभ्या राहणार आहेत.

तृणमूल काँग्रेसने बाणावलीमधून चर्चिल आलेमाव आणि नावेलीमधून त्यांच्या कन्या वालांका आलेमाव यांना उमेदवारी दिली. कुंकळ्ळीमधून चर्चिल यांचे पुतणे युरी आलेमाव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तृणमूलने युती केलेल्या मगोपनेही सुदिन आणि दीपक ढवळीकर यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय हळदोण्यातून किरण कांदोळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर थिवीमधून त्यांच्या पत्नी सविता यांना तृणमूलची उमेदवारी मिळाली आहे.

वरील सर्वांची गोळाबेरीज केल्यास सध्या एकूण 13 जणांना उमेदवारी जाहीर झाली असून, 1 उमेदवार अपक्ष लढणार आहे. एकाच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा बाकी आहे. हे सर्व 15 उमेदवार निवडून आल्यास गोवा विधानसभा निवडणुकीत 37.50 टक्के 'फॅमिलीराज' येऊ शकते. 2017 च्या विधानसभेत पणजीतून भाजपचे बाबूश मोन्सेरात आणि ताळगावमधून त्यांच्या पत्नी जेनिफर आमदार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे आणि त्यांचे पुत्र विश्वजित भाजपचे वाळपईचे आमदार आहेत. एकूण चार म्हणजेच 10 टक्के आमदार कुटुंबशाही प्रस्थापित करत आहेत. 2012 च्या विधानसभेतही सांता क्रूझमधून बाबूश मोन्सेरात आणि ताळगावमधून त्यांच्या पत्नी जेनिफर काँग्रेसकडून आमदार होते.

अशीही घराणेशाही

आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रन्सिस डिसोझा यांच्या मृत्यूनंतर भाजपने 2019 मध्ये त्यांचे पुत्र जोशुआ यांना उमेदवारी दिली. कुंभारजुवे मतदारसंघाचा विचार केल्यास आमदार पांडुरंग मडकईकर यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी जनिता यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलगा सिद्धेश यांचे नाव पुढे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news