

चंदिगढ : हरियाणातील अनेक म्हशी व रेडे चर्चेत असतात. युवराज आणि सुल्तान नावाच्या रेड्यांनी देशात मोठीच प्रसिद्धी मिळवली होती. सुल्तान रेड्याचेच मालक नरेश कुमार यांच्याकडील एका म्हशीनेही आता नावलौकिक मिळवला आहे. कैथलच्या बुढाखेडामधील नरेश कुमार यांच्या या रेशमा नावाच्या म्हशीने सर्वाधिक दूध देण्याचा National record केला आहे. ही म्हैस तब्बल 33 किलो 800 ग्रॅम दूध देते.
नरेश कुमार यांनी चार वर्षांपूर्वी हिसारच्या भगाना येथून 1.40 लाख रुपयांना ही म्हैस खरेदी केली होती. तिला सातत्याने पौष्टिक आहार देऊन व योग्य संगोपन करून तिचे दूध उत्पादन वाढवण्यात आले. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)ने गेल्यावर्षी ती व्यायल्यानंतर एक आठवडाभर तिचे दुग्धउत्पादन तपासले. काही दिवसांपूर्वीच 'एनडीडीबी'ने रेशमा ही देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस असल्याचे प्रमाणपत्र पाठवले.
रेशमाला केवळ हिरवा चाराच दिला जातो असे नाही तर तिला गूळ, मोहरीचे तेल व अन्य पौष्टिक आहार दिला जातो. काही लोक रेशमाला साडेसहा लाख रुपयांमध्येही खरेदी करण्यास तयार आहेत; पण नरेश कुमार यांनी आपण तिची विक्री करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.