ड्रॅगनची मुजोरी

ड्रॅगनची मुजोरी

Published on

दुसर्‍याचे मूल कडेवर घेऊन त्याला आपले नाव दिले की, ते आपले अधिकृत मूल बनते, असा समज चीनने करून घेतला असावा. गेले वर्ष सरत असतानाच चीनने असाच उद्योग करत जगाला आपल्या आचरटपणाचा नमूना दाखवला. अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांना चिनी नावे देत, हे भाग आपले असल्याचा दावा केला. इतकेच नव्हे तर, आपल्या नकाशात हे बदल करत आसुरी विस्तारवादाचे इरादे पुन्हा एकदा स्पष्ट केले. 2017 मध्ये त्याने अशीच आगळीक केली होती. अरुणाचल प्रदेशातीलच सहा जागांना आपल्या प्रांतातील नावे देत कुरापत काढण्याचा प्रयत्न केला होता.

1998 मध्ये भारत आणि चीनमध्ये ऐतिहासिक अनाक्रमण करार झाला. त्यावेळी दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होतील, अशी आशा वाटली होती; पण त्या देशाने केलेली ती दिशाभूल असल्याचे नंतरच्या अनेक घटनांनी सिद्ध केले. 1962 च्या युद्धानंतर चीनने सुमारे 3 हजार 225 किलोमीटरचा भारतीय भूभाग घशाखाली घातला. त्यानंतर ही सीमा आणखी जवळ आली. त्याचा फायदा घेत भारतावर अनेकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेली 3 हजार 488 किलोमीटरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न चीनने बर्‍याचदा केला आहे.

2020 च्या जूनमध्ये गलवान खोर्‍यात झालेला प्रकार याचाच परिपाक होता. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेली हाणामारी अत्यंत गंभीर स्वरूपाची होती. त्यात भारताला आपले 20 जवान गमवावे लागले. कर्नल पदावरील एका अधिकार्‍याचाही त्यात समावेश होता. 1962 नंतर अशा प्रकारे उद्भवलेली ही आणीबाणीची परिस्थिती. या घटनेत त्यांचे पाच लष्करी अधिकारी मारले गेल्याची कबुली चीनचे अधिकृत वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'ने दिली होती. अर्थात, हा देश जगापुढे कधीच सत्य येऊ देत नाही.

स्वत:ला हवे तेच जगापुढे आणणे ही त्याची आजपर्यंतची कूटनीती राहिली. केवळ भारताला लागून असलेल्या सीमेवरच या कुरबुरी सुरू आहेत असे नाही, तर लागून असलेल्या जवळपास सर्वच देशांशी त्याचा सीमावाद आहे. हे कमी की काय म्हणून दक्षिण चीन समुद्रात 25 बेटांवरही त्याने दावा सांगितला. समुद्राखाली असलेल्या तब्बल 55 अस्तित्वांवर त्या देशाचे झेंडे फडकवण्यात आले. अशी महत्त्वाकांक्षा बाळगून असलेला हा देश भारताची कायमच डोकेदुखी बनून राहिला आहे.

अरुणाचल प्रदेश हा प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने उभय देशांदरम्यान नव्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. बीजिंग ऑलिम्पिक वेळी चीनने जाहीर केलेल्या नकाशात अरुणाचलला आपला अधिकृत भाग म्हणून समाविष्ट केले होते. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या जोरदार आक्षेपामुळे नंतर चीनच्या नकाशातून हा भाग वगळण्यात आला खरा; पण गेल्याच वर्षी नवा सीमा कायदा करत ही आगळीक सुरूच ठेवली आहे. हा कायदा अरुणाचलसह सीमाभागावर दावा सांगतो.

संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत असतानाही चीनने कारवाया सुरूच ठेवल्या. या काळात सीमांवर कशी अस्वस्थ परिस्थिती राहील, याचीच काळजी घेतली. त्यातून तैवानसारखा देशही सुटला नाही. अमेरिकेच्या इशार्‍यानंतरही चीनने आपली भूमिका बदललेली नाही. अलीकडे भारताशी व्यापारी संबंध वाढवूनदेखील शेपूट वाकडीच ठेवली आहे. गेल्याच आठवड्यात गलवान खोर्‍यातील वादग्रस्त भागावर चीनने आपला झेंडा फडकवल्याची छायाचित्रे आणि चित्रफिती जारी केल्या.

सुरुवातीला खरोखरच चीनने असे कृत्य केले आहे, असे वाटले. प्रत्यक्षात मात्र एका चिनी चित्रपटातील ते एक द‍ृश्य असल्याचे उघड झाले. एकूणच भारताला या ना त्या मार्गाने त्रास देत कायमची डोकेदुखी करून ठेवायची, असे या शेजार्‍याने बहुधा ठरवले असावे. भारताने वेळोवेळी ताकीद दिली आहे; पण त्याला न जुमानता दर खेपेस नवा विषय उकरून काढायचे धोरण चालूच ठेवले आहे.

अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांना आपली नावे दिल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कडक शब्दांत चीनला समज दिली. अशा कारवाया करण्यापेक्षा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला वाद सोडवण्याच्या द‍ृष्टीने विधायक चर्चा करावी, असा सल्‍ला दिला; पण त्याने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मुजोरी आपल्या स्वभावातच असून, आपल्याला शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध ठेवायचेच नाहीत, असे या देशाने ठरवलेले दिसते. कधी ब्रह्मपुत्रेवर प्रचंड मोठे धरण बांधणे, तर कधी पाकिस्तानपर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्ग तयार करून भारताला शह देण्याच्याच कारवाया तो करत आला आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभारत भारताला सातत्याने धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आशियावर आपले निर्विवाद वर्चस्व असावे, या हेतूनेच ड्रॅगनने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. भारताने कोणतेही क्षेपणास्त्र विकसित करून त्याची चाचणी घेतल्यानंतर पहिला आक्षेप चीनचाच असतो. आपण करू ते बरोबर आणि इतर देश आपले लष्करी सामर्थ्य वाढवतात ते चुकीचे, अशीच भूमिका या विस्तारवादी देशाने सातत्याने मांडली.

अलीकडच्या काळात भारतीय सैन्याच्या हालचाली सुकर व्हाव्यात, यासाठी भारताने अनेक ठिकाणी बोगदे आणि रस्ते बनवले. तेदेखील डोळ्यात खुपत आहेत. आपल्याला भारत दाद देणार नाही, याची कल्पना आल्यानंतरच वेगवेगळ्या मार्गांनी भारताची कळ काढण्याचे उद्योग सुरू ठेवले आहेत. अलीकडेच चीनने कृत्रिम सूर्य तयार करून जगालाच एक प्रकारचा इशारा दिला आहे. ऊर्जानिर्मितीसाठी आपण हा सूर्य तयार केल्याचे चीन सांगत असला, तरी त्याचे इरादे नेहमीच विध्वंसक राहिले आहेत. हा अनुभव लक्षात घेता या उपद्व्यापास वेळीच पायबंद घालायला हवा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news