डोळ्यांची निगा राखताना…

डोळ्यांची निगा राखताना…
Published on
Updated on

डोळ्यांची योग्य निगा राखत असताना, तुम्हाला अनेक गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. डोळ्यांचे कार्य सुरळीत राखण्याच्या दृष्टीने करावयाचे व्यायाम आणि विविध टप्पे याचे गांभीर्य फार कमी जणांना असते. अनेकांना सर्रास होणारे डोळ्यांचे त्रास बरे करण्यासाठी पुढे काही महत्त्वाचे उपाय दिले आहेत.

अनेक तास कॉम्प्युटर वापरल्याने अनेकदा डोळ्यांना थकवा जाणवतो. डोळे कमी वेळा उघड-बंद न केल्यास डोळ्यांतले ल्युब्रिकेशन कमी होते आणि त्यामुळे डोळे अधिक थकलेले, कोरडे होतात.

उपाय : वाचन करताना डोळ्यांपासून किमान 25 सें.मी.चे अंतर राखणे गरजेचे आहे. अनेक तास वाचन करत असताना मध्ये पुरेशी विश्रांती (5 ते 10 मिनिटे) घ्यावी. 5 मीटर अंतरावर असलेल्या लांबच्या वस्तूंवर नजर टाकल्यासही डोळ्यांना आराम मिळू शकतो.

पुरेशी झोप न झाल्याने डोळे कोरडे होणे, यामुळेही डोळ्यांची जळजळ होते. संसर्ग होण्याचे व अस्वस्थपणा येण्याचे हे सर्रास आढळणारे कारण आहे.

उपाय : डोळे ताजेतवाने ठेवण्यासाठी डोळे चोळू नका. डोळ्यांवर गार पाणी मारल्यास डोळे ताजे राहतात व ओलावा टिकून राहतो. कृत्रिम अश्रू किंवा आयड्रॉप किंवा ल्युब्रिकेशन यांसारखे पर्याय वापरल्यास डोळ्यांतला नैसर्गिक ओलावा कायम राहण्यासाठी मदत होते.
काँटॅक्ट लेन्स वापरल्याने झोप अपुरी होणे, ही सर्रास आढळणारी आणखी एक समस्या आहे. अनेक तास काँटॅक्स लेन्स घालून ठेवल्यास डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. यामुळेही डोळ्यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.

उपाय : अशा स्थितीमध्ये चष्मा वापरावा आणि लेन्स आणि चष्मा असा दोन्हीचा आळीपाळीने वापर करावा. विद्यार्थ्यांनी सिलिकॉन हायड्रोजनपासून बनविलेल्या चांगल्या गुणवत्तेच्या काँटॅक्ट लेन्सचा वापर करावा. ऑक्सिजन खेळता राहण्याची प्रक्रिया सुधारित असणारे हे नवे साहित्य आहे. यामुळे अस्वस्थ वाटण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

आकडेवारीनुसार, अपुरी झोप झाल्याने किंवा भरपूर अभ्यास केल्याने परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 5-10 टक्के शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येतो किंवा डोळ्यांना थकवा जाणवतो.

टिप्स

1. तुम्हाला चष्मा लागलेला असेल तर अभ्यास करताना नेहमी चष्मा वापरावा.

2. तुम्ही काँटॅक्ट लेन्स वापरत असाल तर दररोज 10-12 तासांपेक्षा जास्त वेळ लेन्स घालू नका.

3. टीव्ही पाहणे किंवा मोबाईल गेम खेळणे टाळा.

4. 20-20-20 या नियमाचा सराव करा. 20 मिनिटे वाचन केल्यानंतर डोळे 20 सेकंद बंद करा आणि त्यानंतर 20 फूट अंतरावर पाहा. यामुळे डोळ्यांवरचा ताण बराच कमी होईल.

5. ल्युब्रिकंट आयड्रॉप नेहमी किंवा गरजेनुसार वापरा.

साधारणपणे घ्यावयाची काळजी आणि बाळगावयाची सावधगिरी

अभ्यास करत असताना योग्य स्थितीमध्ये बसा. कधीही पाठीवर झोपून वाचन करू नका.

डोळे आणि स्क्रीनची खालची बाजू यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन असणे, ही आदर्श स्थिती आहे.

कॉम्प्युटर टर्मिनलसारख्या परावर्तित करणार्‍या पृष्ठभागांवर काम करत असताना, ग्लेअर व डोळ्यावरील ताण कमी करण्यासाठी
अँटि-रिफ्लेक्शन कोटेड ग्लासेसचा वापर करा.

मंद प्रकाशयोजना असलेल्या ठिकाणी वाचन करणे कटाक्षाने टाळावे, अन्यथा डोळ्यांवर आणखी ताण येतो. धावती बस, ट्रेन किंवा कारमध्येही वाचन करणे टाळावे.

परीक्षेदरम्यान वेळापत्रक बदलत असल्याने त्यानुसार आहारामध्ये चांगले बदल करणे महत्त्वाचे आहे. गाजर, पपई, पालक अशा भाज्यांचे व फळांचे सेवन अधिक करायला हवे. या अन्नामध्ये बिटा-कॅरोटिनचे प्रमाण अधिक असते आणि ते दृष्टी निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे असते.

डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे.

डोळ्यांची नियमित तपासणी – डोळ्यांना काहीही त्रास होत नसला तरी वर्षातून एकदा ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करून घ्या.

सतत डोके दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे आणि डोळ्यांमध्ये सतत वेदना होणे, अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने त्यांच्या पाल्याला नेत्रतज्ज्ञांकडे न्यावे आणि संपूर्ण नेत्रतपासणी करून घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news