डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूल हे ज्ञानार्जनाचे प्रमुख केंद्र बनावे

कोल्हापूर ः सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलच्या नामांतर सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव. शेजारी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, डावीकडून राहुल खंजिरे, जि. प. सदस्य अरुण इंगवले, महेश राव, संजय पाटील-यड्रावकर, श्रीमती राधागोपाल राव, आ. राजू आवळे आदी.(छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर ः सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलच्या नामांतर सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव. शेजारी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, डावीकडून राहुल खंजिरे, जि. प. सदस्य अरुण इंगवले, महेश राव, संजय पाटील-यड्रावकर, श्रीमती राधागोपाल राव, आ. राजू आवळे आदी.(छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूल हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे ज्ञानार्जनाचे प्रमुख केंद्र बनावे, असे प्रतिपादन दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. आळते (ता. हातकणंगले) येथील सेंट पॉल्स इन्टरनॅशनल स्कूलच्या नामांतर सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वस्त्रोद्योगमंत्री व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आळते येथे राव परिवाराने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली, ही कौतुकास्पद बाब आहे, असे सांगून डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, मातृभाषा म्हणून मराठी, राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे शिक्षण, तर आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कोल्हापुरात अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. पालक मुलांच्या शिक्षणावर करणार्‍या खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. भविष्यात संपत्तीचे राष्ट्रीयीकरण होईल; पण बुद्धीचे राष्ट्रीयीकरण होणार नाही. त्यामुळे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.

कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. हातकणंगले दरडोई उत्पन्नात आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख म्हणाले, गेल्या 35 वर्षांपासून राव परिवार शिक्षणाचा प्रसार करीत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये या संस्थेचे नाव आघाडीवर आहे. श्रीमंत व गरीब असा कोणताही भेद न करता सर्वांना समान शिक्षण दिले जाते. कोल्हापुरात अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. यामधून सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करावे. कोल्हापूरला धार्मिक, ऐतिहासिक परंपरा आहे. देशाच्या प्रगतीमध्ये कोल्हापूरचे योगदान मोलाचे असून शिक्षण आणि पर्यटनाचे हे प्रमुख केंद्र व्हावे, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे चेअरमन राजकुमार राव यांनी गेल्या 35 वर्षांतील संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, संस्थेच्या अन्य ठिकाणी देण्यात येणार्‍या गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाचे शिक्षण हे आळते येथील संस्थेतही मिळणार आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल.

आमदार राजू आवळे म्हणाले, शिक्षणातील स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे गुणवत्ता शिक्षण देणे, ही काळाची गरज आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलने शिक्षणातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमास संजय पाटील (यड्रावकर), संस्थेच्या मुंबईच्या चेअरमन राधागोपाल राव, व्हा. चेअरमन विजय राव, सचिव महेश राव, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर, इचलकरंजीचे नगरसेवक राहुल खंजिरे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, तसेच पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news