

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : ठाणे येथील नौपाडा परिसरातील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांपैकी दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली, तर दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. टाकीत केमिकल टाकले होते, याच केमिकलमुळे कामगार गुदमरले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विवेक कुमार आणि योगेश नरवणकर असे मृत कामगारांचे नाव आहे, तर मिथुन कुमार व गणेश नरवणकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान टाकी साफ करण्यासाठी आधी दोन कामगार आत उतरले. या दोन्ही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केली. त्यानंतर इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चारही कामगार टाकीत बेशुद्ध पडले.
ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बचावकार्य केले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.