झोप आणि लठ्ठपणा
आपल्या वजनाचा संबंध आपण नेहमी खाण्याशी जोडतो; परंतु वजनवाढीसाठी खाण्याबरोबरच झोपेची भूमिकाही महत्त्वाची ठरते.वेळोवेळी केलेल्या अनेक प्रकारच्या संशोधनानंतर हे लक्षात आले आहे, की ज्या व्यक्तींची झोप अपुरी असते त्यांच्यामध्ये लठ्ठपणाची समस्या दिसून येते.
जगभरामध्ये जवळजवळ तीस टक्के लोक अपुरी झोप घेत असतात. त्यामुळे वजनवाढ होत राहते. अपुर्या झोपेमुळे वजनवाढीला कारणीभूत अनेक घटक तुमच्या शरीरात कार्यरत होतात. बॉडी मास इंडेक्स – झोप कमी झाली, तर लहान मुलांमध्ये 90 टक्क्यांनी, तर मोठ्यामध्ये 95 टक्क्यांनी बॉडी मास इंडेक्स वाढतो.
भूक- अपुर्या झोपेमुळे तुमचे भुकेचे नैसर्गिक घड्याळ बिघडते. भुकेची भावना जागवणारे घ्रेलिन हे हार्मोन अधिक प्रमाणात पोटात स्रवते, तर पोट भरल्याची भावना देणारे लेप्टीन हे हार्मोन कमी प्रमाणत स्रवते. त्यामुळे अतिखाणे होऊ लागते. परिणामी, तुमचे वजन वाढते.
झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूतील स्वनियंत्रणाचे केंद्र व्यवस्थित काम करत नाही. तुम्ही साहजिकच अती खाऊ लागता. कमी झोपेमुळे मेंदू अन्न विषयक संदेश पटकन ग्रहण करून उत्तेजित होतो. अपुर्या झोपेमुळे अतिगोड आणि अतिचरबी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होऊ लागते. झोपेतील चयापचय क्रियादेखील मंद होऊ लागते. तुमचे वजन योग्य ते राहण्यासाठी तुम्हाला सात ते आठ तास शांत झोपेची अत्यंत गरज आहे. वजन नियंत्रित करताना झोपेचा मुद्दादेखील महत्त्वाचा आहे, हे ध्यानात घेऊन तुमचे नियोजन करावे.

