जोरदार धमाका अन् ATM च्या ठिकऱ्या; साडेआठ लाखांची रक्कम सुरक्षित

जोरदार धमाका अन् ATM च्या ठिकऱ्या; साडेआठ लाखांची रक्कम सुरक्षित
Published on
Updated on

कराड,पुढारी वृत्‍तसेवा : कराड-विटा रस्त्यालगत बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट करून फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला. या कटामध्ये सहभागी झालेल्या चार चोरट्यांपैकी एक जण करवडी तालुका कराड येथील आहे. या सर्वांनी रविवारी रात्री एटीएम फोडण्याचा बेत केला. त्यासाठी त्यांनी अगोदर सुमारे दोन महिने या गुन्ह्याची तयारी सुरू केली होती. यासाठी लागणारे साहित्य इलेक्ट्रिक बॅटरी ,पेट्रोल बॉम्ब, पेट्रोल लाईटर व इतर वस्तू विकत घेऊन तसेच काही तयार करून त्यांनी एटीएम फोडण्याचा कट रचला होता.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सर्व चोरटे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एटीएम जवळ आले. त्यातील एका चोरट्याने एटीएम बाहेर व आतमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून तो बंद केला. ही बाब बँकेच्या हेड ऑफिसला त्वरित समजली. त्यांनी याबाबतची माहिती तालुका कार्यालयाला सांगितली. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले.

पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून वायरलेस द्वारे मेसेज दिल्याने रात्रगस्त घालणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत व चोरट्याने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले‌. तर चोरट्याने पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारल्याने त्यांच्या डोळ्यांना इजा झाली. दरम्‍यान एकाला पोलिसांनी झटापटीत पकडले.

जिलेटीन व डिटोनेटरचा केला वापर

चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी नवीन शक्कल लढवली होती. जिलेटीन व डिटोनेटरचा वापर करून एटीएम उडवून देण्याचा चोरट्यांचा कट होता. त्यानुसार त्यांनी जिलेटिन व डिटोनेटरच्या कांड्या एटीएम मशीनमध्ये टाकल्या होत्या. त्या कांड्यांना जोडलेली वायर त्यांनी तेथून इमारतीच्या बाहेरपर्यंत आणून सोडली होती. परंतु पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला गेला. आणि एक चोरटा पोलिसांच्या ताब्यात सापडला.

परंतु चोरट्यांनी लढवलेली शक्कल निकामी करण्यासाठी बॉम्ब नाशक पथकासह पोलिसांना नऊ तासांचे अथक प्रयत्न करावे लागले‌. तरीही त्यांना यश आले नसल्याने चोरट्यानी केलेल्या प्रयत्नांचाच वापर करून एटीएम मशीनमध्ये अडकवलेल्या जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट करून त्या निकामी कराव्या लागल्या. पहाटे तीन वाजल्यापासून सुरू असलेल्या या धावपळीचा शेवट दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एटीएम मशीन फोडल्यानंतर झाला. यावेळी एटीएम मशीनच्या ठिकऱ्या झाल्या तर मशीनचे स्पेअर पार्ट लांबपर्यंत फेकले गेले होते. इमारतीच्या बाहेर काचांचा खच पडला होता. दरम्यान मशीन फोडल्यानंतर पोलिसांनी मशीनमध्ये ठेवलेली रक्कम सुरक्षित आहे का? याची खात्री केली. मशीन मधील नोटा बाहेर काढून त्याची मोजणी केली असता सर्व पाचशेच्या नोटा असल्याचे निदर्शनास आले. या सर्व नोटांपैकी केवळ पाच नोटा स्फोटामुळे फाटल्याचे दिसून आले.

या सर्व घटनाक्रमात पोलिसांनी प्रसंगावधान राखत केलेले प्रयत्न कौतुकास्पद होते. एका बाजूला चोरट्यांना जखमी अवस्थेतही पकडून ठेवणाऱ्या पोलिसांचे कौतुक तर दुसऱ्या बाजूला एटीएम मशीनमध्ये टाकलेल्या स्फोटक कांड्या निकामी करण्यासाठी पोलिसांची सुरू असलेली धडपड त्यातून प्रयत्नांची पराकाष्टा करत पोलिसांनी एटीएम मशीन मधून सुरक्षित बाहेर काढलेली साडेआठ लाखांची रक्कम. हा सगळा घटनाक्रम पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणाची साक्ष देत होता. म्हणूनच पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरीची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

दोघे पदवीधर, एक डॉक्टर तर एक महाराज

पोलिसांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या चौघांमध्ये दोघे पदवीधर असून एक जण डॉक्टर आहे. तर आणखी एक जण महाराज असून तो प्रवचन देण्याचे काम करतो. यातील एक जण गोरक्षक असल्याची माहिती ही पोलीस तपासातून पुढे येत आहे. सुमारे दोन महिन्यांपासून या गुन्ह्याच्या अनुषंगाने चोरट्यांची तयारी सुरू होती. त्यासाठी त्यांनी आवश्यक ते साहित्य विकत घेतले होते तर काही साहित्य घरी तयार केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. हे सर्वजण गुन्हेगारी क्षेत्राकडे का वळले? याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news