जोतिबाच्या नावानं चांगभलं…चैत्र यात्रा उत्साहात

जोतिबा यात्रेसाठी उपस्थित लाखो भाविक गुलालात अक्षरश: न्हाऊन निघाले होते व जोतिबा यात्रेचे वैशिष्ट्य असणार्‍या सासनकाठ्यांनी आकाशाला गवसणी घातली होती.
जोतिबा यात्रेसाठी उपस्थित लाखो भाविक गुलालात अक्षरश: न्हाऊन निघाले होते व जोतिबा यात्रेचे वैशिष्ट्य असणार्‍या सासनकाठ्यांनी आकाशाला गवसणी घातली होती.
Published on
Updated on

कोल्हापूर / जोतिबा; पुढारी वृत्तसेवा : 'चांगभलं रं चांगभलं… देवा जोतिबा चांगभलं…' असा जयघोष आकाशाला गवसणी घालणार्‍या सासनकाठ्या, गुलाल-खोबरे-दवणा यांची उधळण आणि भक्‍तिभावाने डोंगरावर एकवटलेले लाखो भाविक अशा जल्‍लोषी वातावरणात शनिवारी दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा उत्साहात झाली. यात्रेला महाराष्ट्रासह आंध— प्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

कोरोनामुळे दोन वर्षे जोतिबा यात्रा प्रतीकात्मक पद्धतीने व अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. यामुळे यंदा यात्रेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, ठिकठिकाणी पार्किंग तळ आणि नेटक्या नियोजनामुळे वाहतूक कोंडीचा भाविकांना त्रास झाला नाही.

बळीराजा सुखी होऊ दे : पालकमंत्री

जोतिबा देवाचे व सासनकाठ्यांचे पूजन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील यांनी 'राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खर्‍या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोव्हिडमुक्‍त होऊ दे', असे दख्खनच्या राजाच्या चरणी साकडे घातले. यात्रेच्या नेटक्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्‍त करून भाविकांनी यात्रा शांततेत पार पाडावी, असे आवाहनही केले. यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक दीपक मेहतर, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे देशात क्रमांक एकचे राज्य व्हावे : गृहराज्यमंत्री

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही श्री जोतिबाचे दर्शन घेऊन 'महाराष्ट्र राज्य हे देशात क्रमांक एकचे राज्य व्हावे', असे साकडे जोतिबा चरणी घातले. त्यांनी सासनकाठी क्रमांक 2 मौजे विहे (ता. पाटण) चे दर्शन आवर्जून घेतले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, सांगलीच्या मनीषा दुबुले, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, सहसचिव शीतल इंगवले आदी उपस्थित होते.

जोतिबाची मनोहारी पूजा

चैत्र यात्रेनिमित्त जोतिबाची राजेशाही पद्धतीची मनोहारी पूजा बांधण्यात आली होती. पगडी परिधान केलेली सिंहासनारूढ दख्खनच्या राजाची मूर्ती लक्षवेधी होती. गुरव बाळू सांगळे, महादेव झुगर, निलीन लादे, उत्तम भिवदर्णे यांनी ही पूजा बांधली होती.

अभिषेक, महापूजा आणि पालखी सोहळा

शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पाद्यपूजा, काकड आरती सोहळा झाला. श्री जोतिबास शासकीय महाभिषेक तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते झाला. दरम्यान, दर्शनासाठी रात्रभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सनई, ढोल-ताशे अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर सासनकाठी मानकरी तल्‍लीन होऊन नाचत होते.

सायंकाळी साडेपाचपर्यंत मानाच्या सर्व सासनकाठ्या यमाई मंदिराकडे पोहोचल्या. पावणेसहा वाजता चैत्र यात्रेच्या पालखी सोहळ्यासाठी तोफेची सलामी तोफखाना प्रमुख प्रवीण डबाने यांनी दिली. यानंतर श्री जोतिबा देवाच्या मुख्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिरातील धार्मिक विधीयुक्‍त कार्यक्रम करून पालखी सोहळा श्री यमाई मंदिराकडे लवाजम्यासह रवाना झाला. लाखो भाविकांनी गुलाल-खोबर्‍याची उधळण आणि 'चांगभलं'चा जयघोष केला. पालखी सव्वासहा वाजता सड्यावरील श्रींच्या विसाव्याच्या ठिकाणी थांबली. सूर्यास्त झाल्यानंतर हिलाल दिवटीच्या प्रकाशात दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान होऊन तेथील सदरेवर विराजमान झाला. यानंतर तेथील धार्मिक विधी पार पडले. रात्री आठ वाजता यमाई मंदिरातून पालखी सोहळा जोतिबा मंदिराकडे नेण्यात आला. 9 वाजता जोतिबा मंदिरातील सदरेवर पालखी ठेवण्यात आली. ढोली, डवरी यांच्या देवदेवतांच्या पदांचे गायन झाले व तोफेच्या सलामीने श्रींचा पालखी सोहळा संपन्‍न झाला.

सासनकाठी पूजनावेळी काही काळ गोंधळ

कसबे डिग्रज (ता. मिरज) या तिसर्‍या क्रमांकाच्या सासनकाठीच्या पूजनावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. सासनकाठीसोबत असणार्‍या कार्यकर्त्यांना पुढे जाण्याच्या सूचना करण्यावरून देवस्थान समितीच्या सुरक्षा रक्षकांशी त्यांचा वाद झाला. यामुळे काठीचे पूजन न करताच ते तेथून निघून गेले. क्रमांक नऊच्या सासनकाठीवेळीही ढकलाढकलीच्या प्रकारामुळे गोंधळ झाला.

देवस्थान समितीच्या वतीने विविध सेवा

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने जोतिबा डोंगरावर गेल्या अनेक दिवसांपासून भाविकांसाठी विविध उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात तळपत्या उन्हापासून बचाव करणारी दर्शन रांग, जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये, पार्किंगसाठी वाहनतळ, मोफत बस वाहतूक सेवा यांसह विविध सेवांचा समावेश होता. दानेवाडी फाटा व श्रावणी हॉटेल गिरोली येथून जोतिबा डोंगर या मार्गावर 30 केएमटी बस व 15 एसटी बस धावत होत्या. याशिवाय कोल्हापूर डिझास्टर्सचे 150 जवान, मराठा कमांडोचे 40 जवान आणि देवस्थानचे 25 सुरक्षारक्षक 24 तास सक्रिय होते. मुखदर्शनासाठी दोन मोठ्या एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या होत्या.

सर्व मार्गांवर भाविकांसाठी विविध सेवा

चैत्र यात्रेत प्रतिवर्षीप्रमाणे विविध सेवाभावी संस्था-संघटनांच्या वतीने विविध प्रकारच्या सेवा देण्यात आल्या. जोतिबाकडे जाणार्‍या विविध वाहतूक मार्गांबरोबरच पारंपरिक पायी मार्गावरही या सेवाकार्यासाठीची केंद्रे उभारण्यात आली होती. अन्‍नछत्र, प्रसाद यासह पिण्याचे पाणी, सरबत, ताक, चिरमुरे-भडंग वाटप, आरोग्य सुविधा, दुचाकी व चारचाकी दुरुस्ती अशा विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी यंत्रणा दिवस-रात्र सक्रिय होती. कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असो., फोर व्हीलर ओनर असो., जोतिबा मेकॅनिकल सेवा संस्था, झंवर उद्योग समूह व श्रीराम फौंड्री, आर. के. मेहता ट्रस्ट, रोटरी क्लब सनराईज, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व केमिस्ट असोसिएशन आदींसह संस्था-संघटनांचा समावेश होता.

सहजसेवा ट्रस्टच्या अन्‍नछत्राचा मोठा आधार

सहजसेवा ट्रस्टच्या वतीने जोतिबा डोंगर परिसरातील गायमुखजवळ अन्नछत्राचे नियोजन करण्यात आले होते. तीन दिवसांत तब्बल दीड लाख भाविकांनी याचा लाभ घेतला. भाविकांसोबतच यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सक्रिय असणार्‍या यंत्रणेचा यात समावेश होता. देवस्थान समिती, पोलिस, होमगार्ड, महावितरण, आरोग्य, केएमटी, एसटी महामंडळ, सुरक्षा रक्षक, विविध सेवाभावी संस्था, संघटनांच्या स्वयंसेवकांना सहज सेवा ट्रस्टच्या अन्‍नछत्राचा मोठा आधार होता. 400 स्वयंसेवक व 100 मदतनीस असे 500 महिला-पुरुष अन्‍नछत्रात दिवस-रात्र सक्रिय होते. रविवारी दुपारपर्यंत हे अन्‍नछत्र सर्वांसाठी खुले राहाणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे प्रमुख सन्मती मिरजे व प्रमोद पाटील यांनी केले.

रक्‍तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

गायमुख परिसरात सहजसेवा ट्रस्ट, वारणा ब्लड बँक आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) ब्लड बँकेच्या वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातही रक्‍तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. तीन दिवसांत सुमारे 200 रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केल्याची माहिती सन्मती मिरजे यांनी दिली.

एका पोलिसाची अनावश्यक कार्यतत्परता

जोतिबावर बंदोबस्तात असणारे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी धोंडीराम करे (सांगली) यांनी अनावश्यक कार्यतत्परता दाखविली. यात्रेच्या वार्तांकनासाठी प्रतिवर्षीप्रमाणे विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी डोंगरावर दाखल झाले होते. या प्रतिनिधींची वाहने त्यांनी सुमारे तासभर अडवून ठेवली होती. डीवायएसपी रवींद्र साळोखे यांच्या सूचनेशिवाय कोणालाही सोडणार नाही, असे सांगत त्यांनी देवस्थानचे सचिव, अन्य पोलिस अधिकारी यांचे मोबाईल फोनही घेतले नाहीत. इतकेच नव्हे तर साळोखे यांचा मोबाईल क्रमांकही पत्रकारांना दिला नाही. अखेर देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना आपली जबाबदारी सोडून येथे येऊन पत्रकारांना घेऊन जावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news