जोखीम घेणारे साहित्यिक

जोखीम घेणारे साहित्यिक
Published on
Updated on

प्रत्येक शहरात, मोठ्या गावात आणि खेड्यात
दररोज खोटेपणाचा एक तंबू उभारला जातो
आणि हे करोडो तंबू मिळून
देशाच्या आकाशात
खोटेपणाचा एक विराट शामियाना होऊन जातात…

चंद्रकांत देवताले या कवीने व्यक्त केलेली ही वर्तमानकालीन भयावहता. ती जास्तीची टोकदारच होते आहे. राजसत्ता कोणाचीही असो; शब्दांच्या निखार्‍याचे त्यांना भय असते. त्यामुळेच म्हणता येते की, मुळात लिहिणे हे जोखीम असलेले काम; अस्वस्थ वर्तमानात लिहिणे तर जास्तच जोखमीचे. अशा काळात दोन लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले. आसामी कवी नीलमणी फुकेन आणि कोकणी साहित्यिक दामोदर मावजो. फुकेन 2020 च्या, तर मावजो 2021 च्या पुरस्काराचे मानकरी ठरले.

देशातला सर्वोच्च असा हा साहित्यिक सन्मान. दोन्ही लेखकांची ओळख पुरोगामी लेखक अशी आहे. याचा अर्थ लेखक मंडळी प्रतिगामीही असतात तर? अर्थातच 'होय'. 'प्रगतिशील लेखक संघ' या नामकरणावेळी प्रख्यात साहित्यिक मुन्शी प्रेमचंद म्हणालेले, 'प्रगतिशील शब्दाची काय गरज आहे? लेखकाने तर प्रगतिशीलच असले पाहिजे.' लेखकांची चळवळ उभारणार्‍या प्रेमचंदांची ही भूमिका. तात्पर्य काय, तर काळाची जबाबदारी ओळखून लेखकाला लिहिता आले पाहिजे.

दामोदर मावजो यांचा असा साहित्यिक पिंड आहे. ते ऋजू स्वभावाचे, मृदू बोलणारे; पण भूमिका घेणारे साहित्यिक. वयाच्या ऐंशीकडे वाटचाल करणारे मावजो म्हणतात, 'वय आणि आरोग्याने परवानगी दिली नाही, तर शाहीनबाग, शेतकरी आंदोलनात सहभाग घ्यायचा होता.' एखाद्या पक्षाचे राजकारण पटत नाही, तर 'नाही' म्हणणारे असे ते साहित्यिक. त्यांच्यावर साने गुरुजींचा प्रभाव आहे. साहित्यिकांनी सामाजिक प्रश्नांची सर्वंकष मांडणी करावी.

ती करताना कोणालाही दुखावण्याची गरज नाही. मांडणीमध्ये व्यवस्थेमधील चुका निदर्शनास आणून द्यायला हव्यात. उत्तरासाठीच्या विकल्पांचे किमान सूचन करावे, अशी त्यांचे आग्रहाचे प्रतिपादन. त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठाने साहित्यिकांच्या या उत्तरदायित्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. ज्ञानपीठाने सन्मानित दोन्ही लेखक असा काळ मांडतात. दोन्ही भौगोलिक अंतराने दोन टोकांचे; मात्र हाच कालसुसंगत धागा दोघांच्याही लेखणीत सापडतो. साहित्यिक मंडळी आकाशातून पडत नसतात, तर ती काळाचीच उपज असतात.

रंजनासाठी, स्वतःसाठी, लाभार्थी बनून लेखनकामाठी करणार्‍यांची मांदियाळी काळाच्या ओघात लुप्त होत असते. चार-दोन अक्षरांमुळे 'लेखकराव' होता येते, साहित्यिक घडवतो तो समाज. उरते ते सत्य आणि सत्त्व. याचे कारण लिहिणे स्वतःसाठी असत नाही. ते समाजासाठीच असते. ती व्यक्तीची असली, तरी सामाजिकतेच्या अंतर्भावासह केलेली निर्मिती असते, मग निर्माता कोणीही असो. मूल्यात्मकतेला नवी परिमाणे देणारे साहित्यिकचसमाजात टिकून राहतात.

दुसरे साहित्यिक नीलमणी फुकेन यांनी समयोचित अशी काव्यनिर्मिती केलेली आहे. त्यांच्या साहित्याने भारतीय साहित्य-कविता समृद्ध केलेले आहे. फुलपाखरांचे भावविभोर जसे कवीला साद घालू शकतात, तसेच जळजळीत वास्तवही, असे त्यांचे मनोगत. आसामच्या समृद्ध लोककलेचे गाणे लयदार गाणारा हा कवी. सलील चौधरी या संगीतकाराने आसामी लोकगीतांचा वापर आपल्या संगीताविष्कारामध्ये ताकदीने केला. 'मधुमती'सारख्या एखाद्या चित्रपटाचे उदाहरणही पुरेसे आहे, असो.

खेडोपाडी लपलेला निसर्गसौंदर्याने नटलेला आसाम, आदिवासी पुराणकथा, लोककथेचे दर्शन त्यांच्या साहित्यातून होतेच; पण त्यांनी मांडलेला विचार महत्त्वाचा. कवितेने मनुष्याला त्याचा आत्मा शोधण्यासाठी मदत केली पाहिजे, अशी त्यांची रास्त आणि खोलवर भूमिका. आत्म्याचा शोध हा कवितेचा केंद्रबिंदू म्हणून ते सांगतात. खरे तर, व्यवस्थेत सत्यकथनाची जबाबदारी लोकप्रतिनिधी, साहित्यिक, पत्रकार, शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते यांच्यावर असते. फुकेन यांचा मानवी आत्म्याचा शोध आपल्याला हाच मार्ग दाखवतो.

ते म्हणतात, हिंसक भवतालात कवितेची भूमिका जास्त गंभीर राहते. उपयुक्ततावादी जगामध्ये बदलाच्या भूमिकेतून ते कवितेकडे पाहतात. कवितेचा इतका सर्वस्पर्शी विचार करणारा आणि शब्दांच्या परिणामाचा जागर करणारा हा कवी. स्वतंत्र विचारांचा मार्ग नेहमी खडतरच असतो. दोन्ही साहित्यिक अशा मार्गावरून जाणारे. फुकेन कवितेच्या भाषेत बोलतात. मावजो समन्वयवादी म्हणून अपार करुणेने समाजाकडे पाहतात. विचारवंतांच्या हत्या झाल्यानंतर बोलणारे मावजो यांना 'रायटर आणि फायटर' म्हटले जाते.

अंधश्रद्धेवर प्रहार करणारे मावजो भाषिक वादात अडकून समाजव्यवस्थेचे तुकडे होतील, असे सांगतात. मावजो यांच्या भूमिकेचा, साहित्यातील सांगाव्याचा लिहू पाहणारे हात अभ्यास करतील, अशी अपेक्षा. येथे इंग्रजी पुस्तकांच्या निर्मितीची दुनियादारी आठवते. पुस्तकात काय आहे, याची माहिती पुस्तकातच असते. संबंधित पुस्तकाविषयी कोठे-कोठे काय-काय छापून आले आहे, त्याचीही माहिती पुस्तकातच मिळत असते.

पुस्तकाचे लेखन सुरू होते, तेव्हा काळ कोणता? तो कसा होता? काळाच्या या पटावर कोणत्या-कोणत्या घटकांचा परिणाम, प्रभाव कसा होता? सामाजिक स्थिती कशी होती? संपूर्ण काळाचे 'मॅपिंग' पुस्तकात असते. इंग्रजीत साहित्यिकाचा जीवनक्रम तर भेटतोच, शिवाय काळाचा पटही दिल्यामुळे वाचकालाही एक अदमास बांधता येतो. का? कशासाठी? आपण काय वाचतो आहोत? कोणते संदर्भ आणि पार्श्वभूमीसह वाचतो आहोत? तात्पर्य काय, आपल्या विषयाचा केवढा प्रचंड अभ्यास करून ही मंडळी लिहितात.

परिणामी, वाचकाचाही चांगला गृहपाठ होतो. सार्त्र म्हणतो, 'साहित्याची प्रक्रिया मूलतः सामाजिकच आहे. सहित्यिकांसाठी वाचक आणि वाचकांसाठी साहित्यिक.' त्यामुळे सगळेच बरोबर असे कसे म्हणता येईल? समाज केवळ भावनेवर कसा चालवता येईल? तो विवेकनिष्ठ व्हावयाचा असेल, तर साहित्यिकांनी भूमिका घेतलीच पाहिजे. ज्ञानार्थी समाजनिर्मितीसाठी भूमिकेने लिहिण्याची जोखीम या दोन साहित्यिकांनी घेतली, त्यांच्या अभिनंदनासाठी हा प्रपंच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news