जागतिक होमिओपॅथी दिन : विषमुक्त शेतीसाठी होमिओपॅथीचा पर्याय प्रभावी

जागतिक होमिओपॅथी दिन : विषमुक्त शेतीसाठी होमिओपॅथीचा पर्याय प्रभावी
Published on
Updated on

सांगली; उद्धव पाटील :  वैद्यकशास्त्रात होमिओपॅथी औषधे व उपचारांचे महत्त्व वाढत आहे, पण आता विषमुक्त शेतीसाठी पर्याय म्हणून होमिओपॅथी औषधांचा वापर होऊ लागला आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके न वापरता होमिओपॅथी औषधांच्या वापरातून कमी खर्चात जादा उत्पादन शक्य झाले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात हा प्रयोग यशस्वी झाला आहे, अशी माहिती कीर्ती होमिओ रिसर्च लॅबोरेटरीचे डॉ. वीरेंद्रकुमार पाटील (बिदर, कर्नाटक) यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.

डॉ. पाटील हे गुलबर्गा विद्यापीठाचे होमिओपॅथीक मेडिसिनचे पदवीधारक आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून त्यांनी एम. डी. (होमिओपॅथी) पदवी संपादन केली आहे. तीस वर्षे ते होमिओपॅथी औषधी पद्धतीमध्ये संशोधन करत आहेत. कीर्ती होमिओ रिसर्च लॅबोरेटरीमध्ये त्यांनी होमिओपॅथी औषधे विकसित केली आहेत. मानवावरील औषधाबरोबरच त्यांनी शेतीमध्ये होमिओपॅथी औषधांचा प्रयोग सुरू केला. याचे अत्यंत चांगले परिणाम दिसून येऊ लागले.

डॉ. वीरेंद्रकुमार पाटील यांच्या संशोधनातून बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात भाजीपाला, तृणधान्य, कडधान्यांचे प्रात्यक्षिक घेतले. रसायनमुक्त, विषमुक्त भाजीपाला, पिके घेण्यासाठी होमिओपॅथी पद्धती एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे.
डॉ. पाटील म्हणाले, कोणतेही रासायनिक खत, कीटकनाशक, जैविक औषध न वापरता होमिओपॅथी औषधांचा वापर करून ढोबळी मिरची, रंगीत मिरचीचे उत्पादन घेतले आहे. केवळ 20 हजार रुपये खर्चामध्ये एक एकर क्षेत्रात 35 ते 40 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्यात यश आले आहे. एकरी सात लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात ढोबळी मिरचीबरोबरच तूर, गहू, हरभरा, मेथी, धने, टोमॅटो, मका यावरही होमिओपॅथिक औषधांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. हरभर्‍यावरील घाटे अळीवर नियंत्रण मिळवण्यातही होमिओपॅथी औषधांना चांगले यश मिळाले आहे. या सर्व प्रयोगांसाठी बारामती अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे.

दरम्यान, प्रगतशील शेतकरी दत्तात्रय घाडगे म्हणाले, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथे माळरानावर आंब्याची 5 हजार झाडे आहेत. विविध सोळा प्रकारच्या जातीचे आंबे आहेत. रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ होमिओपॅथी औषधांचा वापर केला आहे. कर्नाटकमधील बिदर येथील डॉ. वीरेंद्रकुमार पाटील यांनी संशोधन केलेल्या होमिओपॅथी औषधांचा वापर केला आहे. होमिओपॅथी औषधे प्रचंड गुणकारी ठरली आहेत. होमिओपॅथी औषधांची किमया भारी ठरली असून माळरानावर आमराई फुलली आहे. निर्यातक्षम आंबे तयार झाले आहेत.

कर्नाटकमध्येही ऊस, तूर, सोयाबीन, हरभरा यासाठी होमिओपॅथी औषधांचा वापर प्रभावी ठरला आहे. भाजीपाला विविध फळबागा, तृणधान्य, कडधान्य, ऊस आदींसाठी रासायनिक औषधे, खतांचा वापर वाढला आहे. यातून मानवामध्ये कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. रासायनिक खते, औषधांमुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. अशा परिस्थितीत होमिओपॅथी औषधांचा पर्याय अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. विषमुक्त शेती आणि जास्त नफा यासाठी रासायनिक औषधे व खतांना पर्याय म्हणून होमिओपॅथिक हा एक प्रभावी पर्याय आहे.
– डॉ. वीरेंद्रकुमार पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news