जागतिक हृदयदिन विशेष : हृदयविकाराची जोखीम कमी करणारे ‘व्हर्क्यूवो’

जागतिक हृदयदिन विशेष : हृदयविकाराची जोखीम कमी करणारे ‘व्हर्क्यूवो’
Published on
Updated on

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  भारतातील हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी 'व्हर्क्यूवो' हे नवे औषध जागतिक हृदयविकार दिनानिमित्त भारतीय बाजारात दाखल होत आहे. विकसित आणि प्रगत राष्ट्रांत सध्या उपलब्ध असलेल्या औषधांच्या किमतीच्या तुलनेत अवघ्या 7 टक्क्यांमध्ये म्हणजेच 127 रुपये प्रति गोळी या किमतीला हे औषध उपलब्ध करण्यात येत असून भारतातील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्युमुखी पडणार्‍या रुग्ण संख्येला आवर घालता येईल, असा दावा करण्यात येत आहे. याला भारताच्या महानियंत्रकांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

बेयर झायडस फार्मा या कंपनीने मर्क इंडिया या कंपनीच्या सहकार्याने हे औषध विकसित केले आहे. हृदयविकाराने मृत्युमुखी पडण्याची जोखीम कमी करणारे पहिले औषध म्हणून या औषधाला जगभरात मान्यता मिळाली आहे. यामुळे हृदयविकार रुग्णांचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे.

भारतामध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या 80 लाख ते एक कोटीच्या दरम्यान आहे. जगभरात ही सर्वात मोठी संख्या समजली जाते. यामध्ये अलीकडच्या काळात तरुणांमधील हृदयविकाराची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय, हृदयविकाराचे निदान झालेल्या प्रत्येक 10 रुग्णांमध्ये 6 रुग्ण निदानानंतर अवघ्या 5 वर्षांत हृदयविकाराने मृत्युमुखी पडतात, अशी सांख्यिकी माहितीही उपलब्ध आहे. या रुग्णांमध्ये रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडून रुग्णाला जीव गमवावा लागणे, हे प्रमुख कारण समजले जाते. 'व्हर्क्यूवो' (सोल्युबल ग्वानिलेट सायक्लेस स्टिम्युलेटर) हे नवे औषध यावर अधिक परिणामकारक ठरत असल्याचे समोर आले आहे. हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णांसाठी सध्या वापरात येणार्‍या उपचार पद्धतीपेक्षा या औषधाची कृती निराळ्या स्वरूपाची आहे. या समस्येला दूर करण्यासाठी ज्या मार्गाची यापूर्वी हाताळणीच झाली नाही, अशा मार्गावरून हे औषध कार्य करते, असा दावा बेयरने केला आहे.

बेयर ही जर्मनस्थित कंपनी आहे. या कंपनीने भारतातील झायडस कॅडिला या कंपनीच्या सहकार्यातून बायर झायडस फार्मा या नावाने उत्पादने भारतात उपलब्ध केली आहेत. या समूहाने फ्रेंच ड्रगमेकर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मर्क या कंपनीच्या मर्क इंडिया या भारतीय उपकंपनीच्या सहकार्याने 'व्हर्क्यूवो' हे औषध बाजारात आणले आहे.

मृत्यू दर कमी होण्यास मदत

मर्क इंडिया कंपनीचे कार्यकारी संचालक मनोज सक्सेना यांच्या मते हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांना 30 दिवसांच्या आत पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागते. अशा रुग्णांचा भारतातील रुग्णालयात होणारा मृत्यू दर 10 ते 30.8 टक्क्यांच्या दरम्यान आहे. जगभरात पाश्चिमात्य देशांच्या या प्रकारातील मृत्यू दराच्या (4 ते 7 टक्के) तुलनेत हा दर सर्वाधिक समजला जातो. हा मृत्यू दर कमी करण्यासाठी या औषधाचा मोठा उपयोग होऊ शकेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news