

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळावा, त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चानंतर 'आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची' पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेस दि. 1 सप्टेंबरपासून प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरातून सुरुवात करण्यात येणार आहे. नृसीहवाडी येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.
दि. 5 सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे या पदयात्रेची सांगता करत जलसमाधी आंदोलन होईल. यामध्ये हजारो पूरग्रस्त शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यानी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, पूरग्रस्त शेतकर्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये जलसमाधीचा इशारा दिला होता. त्याची दखल जिल्ह्यातील तीन मंत्री घेतील, चर्चेस बोलावतील, असे वाटत होते.
परंतु, त्यांनी काही संपर्क साधला नाही. त्यामुळे जाहीर केल्याप्रमाणे आंदोलनाची तयारी केली आहे. पोलिसांनी अडविले, तर आता आमचे हे आंदोलन थांबणार नाही. शेतकर्यांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही.
केंद्रातील अथवा राज्यातील सरकार असो शेतकर्यांना मूर्ख बनवत आहेत. तांत्रिक बाबींचे कारण सांगत शेतकर्यांना मदत देण्याचे लांबवत आहेत. सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच सरकारने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला.
त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळणार नाही. सरकारच्या या भूमिकेमुळेच शेतकर्यांनी गांजा लावण्यास परवानगी मागितली तरी त्याचे काय चुकले? त्यामुळे अतिरेकी, नक्षलवादी तयार होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी डॉ. जालंदर पाटील, वैभव कांबळे, अजित पवार, बाळासाहेब पाटील, रंगराव पाटील, राजाराम देसाई, सागर शंभुशेटे आदी उपस्थित होते.
पंचनामे पूर्ण होताच जिल्ह्यातील मंत्री घोषणा करणार होते. पंचनामे पूर्ण झाले आहेत. पूरग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी ते कधी घोषणा करणार, असा सवाल शेट्टी यांनी केला.
बारा आमदारांच्या यादीत जरी आपले नाव असले, तरी आताच्या आता आमदार करा, नाही तर जीव सोडतो' असे आपण काही म्हणालो नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
नीती आयोग, कृषीमूल्य आयोग या यंत्रणा सरकारच्या बटिक बनल्या असल्याचा आरोप करत शेतकर्याला शेतात लटकलेले बघायाचे की सुखी बघायचे, हे सरकारने ठरवावे, असे ते म्हणाले.
अशी आहे पदयात्रा
दि. 1 सप्टेंबर : सकाळी 8 वाजता प्रयाग चिखली येथून पदयात्रेचा प्रारंभ. शिये येथे रात्री मुक्काम.
दि. 2 सप्टेंबर : सकाळी 8 वाजता शिये येथून प्रारंभ. रात्री चोकाक येथे मुक्काम.
दि. 3 सप्टेंबर : सकाळी 8 वाजता चोकाक येथून प्रारंभ. रात्री पट्टणकोडोलीत मुक्काम.
दि. 4 सप्टेंबर : सकाळी 8 वाजता पट्टणकोडोली येथून प्रारंभ. रात्री अब्दुललाट येथे मुक्काम.
दि. 5 सप्टेंबर ः सकाळी 8 वाजता अब्दुललाट येथून प्रारंभ. नृसिंहवाडी येथे पदयात्रेची सांगता.