

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरूच आहे. उत्तराखंडमधील धनोल्टी येथे हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. जम्मू-काश्मीरमधील १२ जिल्ह्यांत हिमवादळाचा इशारा देण्यात आला
आहे.
उत्तराखंडमधील चमोली, जोशीमठ आणि बद्रीनाथमध्येही बर्फवृष्टी झाली. हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे चार महामार्ग, २४५ रस्ते बंद झाले आहेत. उत्तर भारतातील राजस्थान, बिहारसह सर्वच राज्यांत कडाक्याच्या थंडीचा जोर कायम आहे. दिल्लीत १७ आणि १८ जानेवारीला किमान तापमान ३ अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचदरम्यान राजस्थानमध्ये एकाच दिवसात पारा २ अंश सेल्सिअसने घसरला आहे. माऊंट अबूमध्ये उणे ४ अंश, तर फतेहपूरमध्ये उणे ३.५ अंश सेल्सिअस तापमान होते.