जगातील अनोखे रेस्टॉरंटस् (Photos)

 hotels
hotels
Published on
Updated on

जगभरात काही अतिशय अनोखे असे रेस्टॉरंटस् पाहायला मिळतात. तेथील खाद्यपदार्थांबरोबरच त्यांचे स्थानमहात्म्य, थीम, इमारत वगैरे अनेक गोष्टींमध्ये वेगळेपणा आढळून येतो. अशाच काही 'हट के' रेस्टॉरंटस्ची ही रंजक माहिती…

द रॉक रेस्टॉरंट

झांझिबारमधील हे रेस्टॉरंट जगभरातील पर्यटकांना खुणावत असते. हिंदी महासागरातील या बेटाचा रूपेरी वाळूचा किनारा, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी व सुंदर हवामान इतकेच यामागील कारण नाही. मिचान्वी पिंग्वे बीचजवळ पाण्यात एका मोठ्या शिळेवर हे रेस्टॉरंट उभे आहे व हेच त्याच्या आकर्षणाचे मोठे कारण आहे.

द ग्रोट्टो

थायलंडमधील या रेस्टॉरंटला 'केव्ह डायनिंग' असेही म्हटले जाते. फ्रांनांग बीचवरील एका मोठ्या गुहेत हे रेस्टॉरंट आहे. तेथील सुंदर वातावरण आणि स्वादिष्ट जेवण यामुळे पर्यटकांचे हे आकर्षण बनलेले आहे.

द लॅबासिन वॉटरफॉल

हे रेस्टॉरंट फिलीपाईन्सच्या सॅन पाब्लो सिटीत आहे. त्याचे वैशिष्ट म्हणजे एका कृत्रिम धबधब्याच्या पाण्यात बसून ग्राहक खाण्या-पिण्याचा आनंद घेतात. स्वच्छ पाण्यात ठेवलेले बांबूचे टेबल-खुर्च्या आणि पायात झुळूझुळू वाहणारे पाणी असे द‍ृश्य तिथे असते.

बर्डस् नेस्ट रेस्टॉरंट

हे रेस्टॉरंट थायलंडच्या सोनेवा किरी इको रिसॉर्टचा एक भाग आहे. जमिनीपासून 16 फूट उंचीवर झाडांवर तयार केलेल्या ट्री पॉडस् किंवा घरट्यासारख्या रचनेत ग्राहक खाण्या-पिण्याचा आनंद घेतात. आजुबाजूचा निसर्ग पाहत घरट्यात बसलेल्या एखाद्या पक्ष्यासारखे खाण्याचा हा अनुभव असतो.

हुवाफेन फुशी

मालदीवचा समुद्रकिनारा नेहमीच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करीत असतो. तेथील हुवाफेन फुशी या रेस्टॉरंटमध्ये तर पाण्याखाली रंगीबेरंगी प्रकाशझोतांची व्यवस्था केलेली आहे. पाण्यात तारांगणच अवतरले असावे अशी तेथील शोभा असते.

ग्रोट्टा पॅलेझ्झीस

इटलीमधील हे सुंदर रेस्टॉरंट समुद्रकिनारी असलेल्या एका मोठ्या गुहेत आहे. पोलिग्‍नानो नावाच्या मच्छीमारांच्या गावात हे रेस्टॉरंट आहे. ही गुहा सन 1700 पासूनच लोकप्रिय आहे.

व्हर्टिगो रेस्टॉरंट

हे रेस्टॉरंट थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आहे. त्याचे वैशिष्ट म्हणजे ते एका उत्तुंग इमारतीच्या छतावर आहे. बनियान ट्री हॉटेलचे हे रेस्टॉरंट शहराचे विहंगम द‍ृश्य पाहत खाण्या-पिण्याचा आनंद देणारे आहे. शहरावर जणू काही आपण तरंगत आहोत असा आभास इथे होतो.

इथा रेस्टॉरंट

मालदीवमधील हे रेस्टॉरंट चक्‍क समुद्राच्या पाण्याखाली आहे. समुद्र किनार्‍याजवळ पाण्याखाली 16 फूट म्हणजेच 5 मीटर खोलीवर हे रेस्टॉरंट आहे. तिथे बसून आजुबाजूची सागरी दुनिया न्याहाळत खाण्या-पिण्याचा आनंद घेता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news