चीन अंतराळातूनही अणुहल्ला करणार!

चीन अंतराळातूनही अणुहल्ला करणार!
Published on
Updated on

चीन ने हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी नुकतीच घेतली. चीनने हा कार्यक्रम अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडला; पण बातमी फुटलीच. गुरुवारी दस्तुरखुद्द अमेरिकेने चीनच्या या चाचणीला दुजोरा दिला आहे. चीनची हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी खरे तर यशस्वी ठरली नाही. लक्ष्यापासून 32 किलोमीटरचा फरक पडला. पण चीनने थेट अंतराळातून पृथ्वीवर हव्या त्या ठिकाणी अणुहल्ला करण्याचे तंत्र विकसित केले आहे, हे या चाचणीने सिद्ध केले आहे.

विशेष म्हणजे हायपरसोनिक क्षेपणास्त्र हल्ला रोखणारी कुठलीही यंत्रणा अद्याप अस्तित्वात आलेली नाही. अमेरिकेने चीनच्या या चाचणीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगात सन 1957 मध्ये पहिल्यांदाच रशियाने अंतराळात स्पुत्निक हा उपग्रह सोडला होता. त्यानंतर उपग्रहांच्या प्रक्षेपणाची स्पर्धाच जगातील विकसित राष्ट्रांमध्ये सुरू झाली. तशीच चीनच्या या चाचणीमुळे विकसित देशांमध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्र स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा जगाला धोका ठरेल, अशी भीती अमेरिकेने वर्तविली आहे. चीनने चालू वर्षातच ऑगस्टमध्ये अण्वस्त्र क्षमतेची हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. अत्यंत गोपनीय पद्धतीने ती झाली. पण अखेर 16 ऑक्टोबरला ही बातमी फुटली. आता अमेरिकेने त्याला दुजोरा दिला आहे. जगभरातील गुप्तहेर यंत्रणांना चकवा देण्यात चीन यशस्वी कसा ठरला, त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रिटनमधील 'फायनान्शिअल टाईम्स' या वृत्तपत्रातील लेखानुसार एका हायपरसोनिक ग्लाईड व्हेकलसह चिनी लष्कराने लाँग मार्च रॉकेटची डागणी केली. अंतराळाच्या खालील कक्षेत पोहोचल्यानंतर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यावर अचूक धडकणे अपेक्षित होते. पण लक्ष्याच्या 32 किलोमीटर लांबवर ते आदळले. थोडक्यात काय तर चीनची ही चाचणी यशस्वी ठरली नाही, पण चीन हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात सक्षम होण्याच्या केवळ एकच पाऊल मागे आहे, ही बाब या चाचणीने अधोरेखित केली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे चीन अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला चकवा देऊ शकतो, ही बाबही या चाचणीने सिद्ध केली आहे.

ही आहेत हायपरसोनिक वैशिष्ट्ये

  • हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वेध घेणे अशक्य असते.
  • अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राप्रमाणेच हायपरसोनिक क्षेपणास्त्राची गतीही ध्वनीच्या गतीपेक्षा (ताशी 1 हजार 235 कि.मी.) किमान 5 पट अधिक वा जवळपास ताशी 6 हजार 200 कि.मी. असते.
  • क्रूझ आणि बॅलेस्टिक दोन्ही प्रकारच्या क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्ये हायपरसोनिकमध्ये अंतर्भूत असतात.
  • बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आकाशात फार उंचावर गेल्यानंतर लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करते. दुसरीकडे हायपरसोनिक त्याहून कमी उंचीपर्यंत येऊन अत्यंत वेगाने व रडार यंत्रणेच्या टप्प्यात न येता लक्ष्याचा भेद करते.
  • बॅलेस्टिक तंत्रज्ञानाच्या उलट हायपरसोनिक तंत्रज्ञानात उड्डाणानंतरही टार्गेटमध्ये बदल करता येतो.

चीनची ही चाचणी जगात प्रथमच रशियाने अंतराळात स्पुत्निक नावाचा उपग्रह सोडला त्या क्षणाच्या तोडीची आहे. रशियाच्या स्पुत्निकमुळे सर्वच विकसित देशांत उपग्रह स्पर्धा सुरू झाली होती. चीनच्या या चाचणीमुळे हायपरसोनिक क्षेपणास्त्र स्पर्धा सुरू होईल. ती जगाच्या अस्तित्वालाच मारक ठरेल.
– मार्क मिले, टॉप जनरल, जॉईंट चिफ्स ऑफ स्टाफ, अमेरिका

  • चीन पास झाला तर अमेरिका, जपान फेल : चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केल्यास अमेरिका आणि जपानच्या क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा निष्फळ ठरतील. दोन्ही देशांच्या या यंत्रणा पारंपरिक बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news