

बीजिंग : चिन्यांच्या अजब देशात काय घडेल हे काही सांगता येत नाही. आता एका चिनी माणसाने चक्क अॅपलच्या आयफोनचे रूपांतर फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये केले आहे. आयफोनच्या किमती साधारण फोनपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. अत्याधुनिक फीचर्स आणि उच्च दर्जाच्या सिक्युरिटी फीचर्समुळे अॅपलच्या फोनचे जगभरात चाहते आहेत.
नुकताच अॅपल आयफोन 14 लाँच झाला आहे. या फोनला जगभरात यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी अद्याप अॅपलला फोल्डेबल आयफोन बनवता आलेला नाही. कंपनीने जरी फोल्डेबल आयफोनबाबत काही हालचाल केलेली नसली तर चीनमधील एका आयफोन चाहत्याने मात्र या दिशेने पाऊल टाकले आहे.
चीनमधील एका व्यक्तीने आयफोनचे फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये रूपांतर केले आहे. त्याने आपण तयार केलेल्या फोल्डेबल आयफोन डिव्हाईसचा बनावट प्रमोशनल व्हिडीओदेखील बनवला आहे. ज्यामध्ये असे दिसते की, फोनमध्ये 5-जी कनेक्टिव्हिटी आहे आणि तो ए-16 बायोनिक चिपसेट सपोर्टद्वारे चालतो. समोरील बाजूला 12 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. तर डिव्हाईसच्या डिस्प्लेमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर पॅनेल आहे, जो फोल्ड केला जाऊ शकतो. याशिवाय हा फोन प्रो सीरिज कॅमेरा सेटअपदेखील देतो आणि त्यात सिरॅमिक शील्ड टेक्नॉलॉजी आहे. चीनमधील लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बिलिबिलीवर हा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.