

वॉशिंग्टन : चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असो किंवा मंगळासारखा शेजारचा ग्रह असो, भविष्यात माणसाला आश्रय घेता यावा असे ठिकाण या दोन खगोलांच्या रूपाने शोधले जात आहे. अर्थातच अशा ठिकाणी मानवी वसाहत स्थापन करण्यासाठी अनेक गोष्टी अनुकूल करून घ्याव्या लागणार आहेत. त्यामध्येच सूर्याच्या रेडिएशनपासून बचाव करू शकणार्या निवार्याचाही समावेश आहे. आता संशोधकांनी चांद्रभूमीवर असा एक निवारा शोधला आहे. हा एक मोठा खड्डा असून तो सूर्याच्या धोकादायक रेडिएशनपासून माणसाचे संरक्षण करू शकेल.
चंद्रावर सूर्याच्या धोकादायक रेडिएशनमुळे तापमान सामान्य राहत नाही. आता त्यावर हा एक उपाय दिसून आला आहे. चंद्रावर असे काही खड्डे किंवा मोठी विवरे आहेत जिथे माणूस आश्रय घेऊ शकतो. तेथील तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असते. चंद्रावरील हे संशोधन भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. चंद्रावर दिवसाचे तापमान पृथ्वीपेक्षा 15 पट अधिक म्हणजे सुमारे 125 अंश सेल्सिअसपर्यंत असते. चंद्राच्या अंधार्या बाजूकडील तापमान उणे 173 अंश सेल्सिअसपर्यंत उतरते. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या लूनार रिकनायसन्स ऑर्बिटरचे प्रोजेक्ट सायंटिस्ट नूह पीटरसन यांनी सांगितले की चंद्रावरील ही विवरे किंवा खड्डे एक स्थिर वातावरण बनवतात. त्यामुळे तिथे राहून चंद्राबाबत अधिक जाणून घेणे भविष्यात शक्य होऊ शकेल. अशा काही विवरांना 2009 मध्येच शोधण्यात आले होते. त्यावेळेपासून त्यांचा वापर एखाद्या निवार्यासारखा करता येऊ शकेल का हे तपासून पाहिले जात आहे. चंद्रावरील एखाद्या पोकळ गुहांसारखेच हे खड्डे आहेत. अशा 200 पेक्षा अधिक खड्ड्यांपैकी 16 खड्डे हे लाव्हा ट्यूबचे आहेत. नव्या संशोधनाचे नेतृत्व करीत असलेले टायलर होर्वथ यांनी सांगितले की सध्या वैज्ञानिक 328 फूट खोल खड्ड्याचे निरीक्षण करीत आहेत. या खड्ड्याला 'मेर ट्रँक्विलिटॅटिस' असे नाव देण्यात आले आहे.