गोवा : ब्रिटीश पर्यटक महिलेवर हरमल किनारी बलात्कार

गोवा : ब्रिटीश पर्यटक महिलेवर हरमल किनारी बलात्कार
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

ब्रिटीश महिला पर्यटकावर हरमल समुद्रकिनारी भर दुपारी बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. पीडितेने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी जोयल डिसोझा ( वय 32, हरमल) या संशयिताला अटक केली आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी पीडिता हरमल किनार्‍यावरील गोड्या पाण्याच्या तळ्याजवळ पर्यटनाचा आनंद लुटत होती. त्यावेळी जोयलने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने सोमवारी 6 रोजी पेडणे पोलिसात तक्रार नोंद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता 96 -2022 नुसार 376 कलमान्वये जोयलवर गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक केली. कोठडी मिळवण्यासाठी न्यायदंडाधिकार्‍यासमोर त्याला हजर केले होते.

यापूर्वीच्या घटना

या घटनेमुळे यापूर्वी गोव्यात झालेल्या दोन परदेशी महिलावरील अत्याचार व खून प्रकरणांविषयी समाजमाध्यमात चर्चा सुरू झाली. काही वर्षांपूर्वी कळंगुट किनार्‍यावर ब्रिटिश तरुणी स्कार्लेट किलिंग हिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. काणकोण किनार्‍यावर डॅनियल मेकलागीन या आयरिश तरुणीवरही अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला होता. या दोन्ही घटनांची देशासह परदेशातही चर्चा झाली होती.

कायदा सुव्यवस्था नाही

सवेरा संघटनेच्या अध्यक्षा तारा केरकर म्हणाल्या, राज्यात कायद्याचा खेळ सुरू आहे. या दोन महिन्यात ज्या प्रकारे खून, बलात्काराची प्रकरणे वाढत आहे, ते पाहिल्यास राज्यात कायदा, सुव्यवस्था नाही, असे वाटते. सकाळी शाळा, महाविद्यालयात जाणारी मुलगी पुन्हा सुखरूप येऊ दे, अशी हुरहूर पालकांना लागलेली असते. भविष्यात महिलांना घराबाहेर पडणे कठिण होईल. बलात्कार झाला की लगेच अटक करतात खरे पण काही वर्षांनी त्यांना सोडण्यात येते. यामुळे बलात्कार म्हणजे खेळ, असे त्यांना वाटू लागले आहे. अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची प्रतिमा आणखीन मलीन होते.

कठोर शिक्षा झाली तरच…

बायलाचो एकवट संस्थेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस म्हणाल्या, बलात्कार झाल्यावर लगेच अटक होणे कौतुकास्पद आहेच; पण ही कृत्ये होऊ नये म्हणून पाऊले उचलणेही तितकेच गरजेचे आहे. बलात्कार प्रकरणी कितीही वजनदार माणूस असला तरी कठोर कारवाई झालीच पाहिजे. या नराधमांना दोषी ठरवून कठोर शिक्षा होईल तेव्हाच बलात्कार सारखे गुन्हे थांबण्यास मदत होईल. मुख्यतः हे प्रकार का घडतात यावर विचार व्हायला हवा. बलात्काराची घटना दिवसा घडलेली आहे. परिणामी पोलिसांनी दिवसाही गस्त वाढविण्याची गरज आहे.

पुन्हा जागतिक नामुष्की

माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले, माणसाने माणुसकी हरवली आहे त्याचे ही घटना उदाहरण आहे. शांंत, सुंदर आणि पर्यटक राज्यात अशा घटना होणे म्हणजे गोव्यासाठी हा लांच्छनास्पद प्रकार आहे. सरकार व खासगी संस्थांना अशा घटना होऊ नयेत यासाठी जागृतपणे काम करण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवून त्यांना सुसंस्कारित करणे गरजेचे आहे. गोव्यात वाढलेले मसाज पार्लर, दारू आणि अमली पदार्थ यांचे हे दुष्पपरिणाम आहेत. अशा गोष्टींचा अतिरेक झाल्याने असे काळीमा फासणारे प्रकार घडतात. हरमल येथे घडलेला प्रकार हा गोव्याची जागतिक पातळीवर नामुष्की करणारा प्रकार आहे.

संशयित स्थानिक आहे म्हणून टाळाटाळ नको

बायलांचो साद संस्थेच्या निमंत्रक साबीना मार्टीन म्हणाल्या, गोव्यात महिला सुरक्षीत नाहीत हे वेळोवेळी अशा घटनांमुळे स्पष्ट होते. सरकारने कॅसिनो, मसाज पार्लर, दारू, जुगार याला खुले समर्थन दिलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाण़ी वेश्या व्यावसायही चालतो. हीच गोव्याची गोव्याबाहेर ओळख बनली आहे. गोव्यात येणारे पर्यटक गोवेकर महिलांना त्याच नजरेने पाहतात. गोव्यात महिला आयोगाला अनेक वर्षे अध्यक्ष नाही. महिला आयोगच नाही तर महिला कुणाकडे न्याय मागणार? पोलीस स्थानकावर पोलीस, वकील आणि गुन्हेगार यांची मिलीभगत चालू आहे. बोगस अशासकीय संस्था (एनजीओ) तयार करून अत्याचाराची प्रकरणे हाताळली जातात. स्थानिक गुन्हेगार असल्यास गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली जाते, तर बाहेरच्या व्यक्तीवर लगेचच कारवाई होते. अशा वातावरणात काहीजण गुन्हा करण्याच्या संधीची वाट पहात असतात, हरमल येथे घडलेला प्रकार असाच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news