

मडगाव , पुढारी वृत्तसेवा : कुंकळ्ळीतील शूरवीरांनी जुलै 1583 मध्ये उभारलेला लढा हा देशातील वसाहतवादी शक्तींविरोधातील पहिला लढा होता. सरकारने हा लढा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, यासाठी आपण विधानसभेच्या अधिवेशनात ठराव मांडणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर सर्व सहकारी आमदारांनी हा ठराव एकमताने संमत करण्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे.
सभापतींनी सदर ठराव दाखल करून घेतल्यास या उठावाच्या स्मरण दिनीच म्हणजे 15 जुलै रोजी विधानसभेत चर्चेस येणार आहे. देशातील पहिला उठाव तथा असहकार चळवळीचे स्मरण करुन देणार आहे. योगायोगाने 15 जुलै हा दिवस सरकारने गोवा राज्याचा युद्ध स्मारक दिवस म्हणून घोषीत केला आहे.
कुंकळ्ळीचा लोकप्रतिनीधी म्हणून दिल्लीतील युद्ध स्मारकाकडे आयोजित सरकारी कार्यक्रमात उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती. परंतु, विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजामुळे मला प्रत्यक्षात तेथे हजर राहणे शक्य होणार नाही. या शूरवीरांना अभिवादन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर सर्व सहकारी आमदारांनी हा ठराव एकमताने संमत करण्यास पाठींबा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
कुंकळ्ळीतील तसेच इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात लढताना आपले सर्वस्व दिले आहे. कुंकळ्ळीतील स्मारकासह अन्य स्मारकांची दुरुस्ती व सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी आपण करणार आहे. पुरातत्व खात्याकडे वास्तुविशारद हेसिंतो पिंटो यांनी 22 मार्च 2021 रोजी सादर केलेल्या अहवालावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ऐतिहासिक स्थळे अधिसूचित करा
गोव्यातील अनेक हुतात्मा स्मारके व ऐतिहासिक स्थळे अत्यंत दयनीय स्थितीत आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती व देखभाल करणे गरजेचे आहे. गोवा मुक्ती लढ्याशी संबंधित सर्व स्थळांची यादी करून ती ऐतिहासिक स्थळे म्हणू अधिसूचित करण्याची मागणी करणार असल्याचे आलेमाव म्हणाले.