गोंधळातच ‘गोडसाखर’ चालविण्यास देण्याचा ठराव मंजूर

गोंधळातच ‘गोडसाखर’ चालविण्यास देण्याचा ठराव मंजूर
Published on
Updated on

गडहिंग्लज ; पुढारी वृत्तसेवा : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याच्या विषयावर शनिवारी प्रशासकांनी बोलावलेल्या विशेष सभेला मोठी गर्दी झाली होती. पहिला तासभर शांततेत सुरू झालेली सभा ऐनवेळी गोंधळात रूपांतरित झाली अन् 'गोडसाखर' चालवण्यास देण्याचा ठराव प्रशासक अरुण काकडे यांनी मांडला. 'मंजूर…मंजूर'च्या घोषणा देत गोंधळातच ठराव मंजूर करण्यात आला.

यानंतर विरोधकांनी प्रशासकांना धारेवर धरत सभागृहाबाहेर पडण्यास मज्जाव केला. यातूनच रेटारेटी व धक्काबुक्कीही झाली. पोलिसांनी कडे करत काकडे यांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतरही अर्धातास राडा चालूच होता. पोलिसांनी बळाचा वापर करतच विरोधकांना रेटून प्रशासकांना रवाना केले. दरम्यान, विरोधकांनी ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.

आजच्या विशेष सभेसाठी विरोधक व सत्ताधार्‍यांनी मिळेल त्या वाहनातून सभासदांना आणले होते. सभासस्थळावर प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. बॅरिकेडस् लावून व्यासपीठ बंदिस्त केले होते. स्वागत जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांनी केले. प्रास्ताविक उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले.

प्रशासक काकडे यांनी कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तसेच संचालक मंडळाची निवडणूक व कारखाना चालवण्यास देण्याची प्रक्रिया ही नियोजित वेळेत होणार असून शेवटच्या महिन्याभरामध्ये सत्तेवर येणार्‍या संचालकांना कारखाना योग्य पद्धतीने चालवण्यास द्यावयाचा आहे. कारखाना चालवण्यास देण्याबाबत एकमत व्हावे व मते मांडावीत, असे सांगितले.

सेवानिवृत्त कामगार संघटनेचे शिवाजीराव खोत यांनी पहिल्यांदा कामगारांचे पैसे द्या, 'स्वाभिमानी'च्या राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी सर्व देणी एकदाच अंतिम करा, सहकारी तत्त्वावरील कारखान्याला कारखाना चालवण्यास द्या, मात्र अंतिम निर्णय पुन्हा सभासदांना बोलावूनच माहिती देऊनच करा, अशी मागणी केली. सतीश पाटील यांनी कंपनीला चालवण्यास देण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले, तर अमर चव्हाण यांनी स्वबळावरच कारखाना चालवूया, असे मत मांडले. संग्रामसिंह नलवडे बोलण्यासाठी आले असता सेवानिवृत्त कामगारांनी विरोध केल्याने ते माघारी परतले.

माजी उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण बोलायला उभे राहताच सेवानिवृत्त कामगारांनी गोंधळ घालत त्यांना मज्जाव केला. यातूनच बरीच वादावादी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासक काकडे यांनी थेट माईक हातात घेत भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास मंजुरी आहे का, म्हणताच…प्रचंड गोंधळात मंजूर..मंजूरच्या घोषण दिल्या तोवर विरोधकांनी हातात नामंजूरचे बॅनर घेऊन नामंजूर…नामंजूरच्या घोषणा दिल्या. राष्ट्रगीत संपताच मंजूर म्हणणारे सभासद सभागृहाबाहेर पडले तर विरोधकांनी प्रशासकांना घेराव घालत सभा तहकूब केल्याचे लेखी द्या; अन्यथा सोडणार नाही, अशीच भूमिका घेतली.

प्रशासक काकडे यांनी व्हिडीओ शूटिंग केले आहे. त्यावर निर्णय घेणार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी अमर चव्हाण व अन्य कार्यकर्ते आक्रमक झाल्याने गोंधळ वाढला. यादरम्यान पोलिस व विरोधकांमध्येही झोंबाझोंबी झाली. याबरोबरच जिल्हा विशेष लेखापरीक्षक अमर पाटील यांनाही बराच काळ विरोधकांनी थांबवून प्रश्नांचा भडीमार केला. विरोधकांनी चेअरमन कक्षासमोर बैठक घेऊन प्रशासकांचा निषेध करत न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.

चव्हाण व खोत यांच्यात शिवराळ भाषा…

सभागृहामध्ये प्रकाश चव्हाण हे मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त कामगारांनी चव्हाण यांना बोलण्यास मज्जाव करताच जोरदार गोंधळ झाला. चव्हाण व खोत हे एकमेकांसमोर येत शिवराळ भाषेचा वापर करू लागले. यातूनच मोठा गोंधळ झाला अन् संपूर्ण सभेचाच नूर पालटला व यातच मंजूरचा ठराव मांडण्यात आला.

तासभर शांत, एकदम स्फोट….

विशेष सभेमध्ये गोंधळ होणार हे गृहीत धरून जोरदार नियोजन करण्यात आले होते. मात्र, पहिल्यांदा प्रशासक काकडे यांनी अतिशय नियोजनबद्ध सभा हाताळल्याने जराही वादाचा प्रसंग आला नव्हता. त्यामुळे तासभर सभा शांत होती, मात्र अचानकच स्फोट झाल्याप्रमाणे सभेत गोंधळ निर्माण झाला.

प्रचंड रेटारेटी अन् तणाव…

प्रशासक काकडे यांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर सोडणार नाही, अशीच भूमिका विरोधकांनी घेतल्याने पोलिसांना काकडे यांना बाहेर काढताना प्रचंड रेटारेटी करावी लागली. यातच पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news