गुरुनानक : पौर्णिमेचा विचारप्रकाश

गुरुनानक : पौर्णिमेचा विचारप्रकाश
Published on
Updated on

गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्मदिवस 'प्रकाश दिन' म्हणून देशभर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

भारतीय संत परंपरेमध्ये गुरुनानक यांचे श्रेष्ठ आणि आदरणीय स्थान आहे. त्यांचा जन्म कार्तिक पौर्णिमेदिवशी झाला. पंजाबमध्ये या पौर्णिमेला 'कटक पौर्णिमा' असे संबोधले जाते.

गुरुनानक यांच्या जन्माचा कालखंड पाहिल्यास त्यावेळी सबंध देशावर सुलतानशाहीचा काळोख पसरलेला होता. परकीयांच्या राजवटीमुळे लोकांना धर्म, संस्कृती आणि विचारस्वातंत्र्य नाममात्र होते. अशा अंधारलेल्या परिस्थितीत गुरुनानकांचा जन्म रावी नदीच्या काठी झाला. जन्मापासूनच गुरुनानक यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. प्रश्न विचारायचे आणि उत्तरे घ्यावयाची, या पद्धतीने त्यांच्या विचारचिंतनाला गती प्राप्त झाली. समाजाला, देशाला घडविणार्‍या समाजाविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.

आपण सबंध मानवतेच्या कल्याणासाठी काही नवी सूत्रे सांगावीत आणि संपूर्ण समाजाला एका सुवर्णधाग्यात बांधावे, या अंतःप्रेरणेने त्यांनी चिंतन आणि मनन सुरू केले. या मंथनातूनच गुरुनानकांचा विकास होत गेला. ते तत्त्वज्ञ होते, दार्शनिक होते आणि काळाच्या पुढे असलेले द्रष्टे महापुरुष होते. त्यामुळे त्यांना तत्कालीन समाजापुढील प्रश्न आणि त्यातील गुंतागुंत कळू शकली व या प्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी नवी दिशा विकसित केली. त्यातूनच शीख धर्माची स्थापना झाली. तत्कालीन समाजामध्ये असलेल्या रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धांविषयी त्यांच्या मनात कमालीचा उद्वेग होता. या सर्व गोष्टी बदलल्या पाहिजेत आणि समाजाला एकत्र बांधणारा धर्म आपण दिला पाहिजे ही त्यांची धारणा होती.

त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये 'गुरुग्रंथ साहिब' हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये गुरुनानक यांच्या स्वतःच्या 974 ओव्या आहेत. त्या काळातील संत नामदेव, संत रोहिदास यांसारख्यांच्या सुवचनांचाही समावेश त्यात आहेत. त्यांच्या धर्मग्रंथातून संगीत-गायन करण्याची परंपरा सांगितली आहे. त्यातून शास्त्रीय रागदरबारीच्या विकासाच्या आधारे आपल्या धर्मग्रंथातील कवनांना अमररूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

ही कवने भारताच्या वायव्य सरहद्द भागामध्ये सर्वतोमुखी झाली. त्यांच्या धर्माचा प्रचार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात सर्वदूर झाला. त्यांनी आपल्या मुख्य प्रदेशापासून थेट श्रीलंकेपर्यंत प्रवास केला होता. या प्रवासामध्येही त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार केला. त्यांच्या तत्त्वज्ञानातील साधेपणा, आचरणातील लोकधर्म आणि लोकाभिमुख कल्याणकारी उपक्रम यामुळे हा धर्म अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. तत्कालीन मार्ग काढणे तसे अवघड होते; परंतु गुरुनानकांची अढळ श्रद्धेने ही वाट सुकर बनवली.

गुरुनानक आपल्या वडिलांना मदत म्हणून शेतीमधील छोटी-मोठी कामे करत असत. त्यांच्याकडे एका जमीनदाराच्या जमिनीचे रक्षण करण्याचे काम होते; परंतु उपाशीपोटी असलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पाहून त्यांचे हृदय हेलावले आणि शेत व धान्य त्यांनी पक्ष्यांना खुले करून टाकले. ईश्वराचे वरदान असेल तर धनधान्याची समृद्धी होईल, पक्ष्यांनाही खायला मिळेल आणि माणसांनाही भरपूर धनधान्य मिळेल, या भावनेने त्यांनी पिकांची देखभाल केली. तेव्हा गुरुनानक असे म्हणाले होते की, 'दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम ।' या प्रसंगातून त्यांची उदात्तता, उत्कटता आणि प्राणिमात्रांविषयी असलेली त्यांची सहृदयता दिसून आली.

जैवविविधतेच्या आजच्या काळात त्यांचा विचार सर्व प्राणिमात्रांना एकत्र घेऊन कसा न्याय देणारा होता, हे यातून लक्षात येत. गुरुनानकांच्या ग्रंथरचनांवर भाष्य करणारे अनेक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, मराठी तसेच अनेक विदेशी भाषांतूनही प्रकाशित झाले. आचार्य रजनीश यांनीदेखील गुरुनानकांच्या धर्मतत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारा विस्तृत असा ग्रंथ लिहिला आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत आपल्या धर्मपंथाने जोडण्याचे काम आणि आपल्या सामाजिक व धार्मिक विचारप्रसाराने एक अद्भुत धार्मिक क्रांती घडविण्याचे कार्य गुरुनानकांनी केले.

गुरुनानक यांनी श्रीलंकेबरोबरच आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका तसेच युरोपमधील काही भागांतही विचारांचा प्रसार केला. बगदादमधील काही शीलालेखांतून त्यांच्या विचारांचे दर्शन घडते. 11 वर्षे ते या भागात प्रसार-प्रचार करत होते. त्यांच्या मुलाखती, चर्चा, प्रवचने यातून त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव सर्वदूर पडला. गुरुनानक यांनी स्वतःचे एक दर्शन तत्त्वज्ञानच विकसित केले होते. याचा प्रभाव पूर्व आणि पश्चिमेकडे सर्वत्र दिसून येतो.

संशोधक आणि अभ्यासक गुरुनानकांच्या चरित्राचे मूल्यमापन करताना तीन दृष्टिकोनांतून पाहतात. पहिला विचार म्हणजे गुरुनानकांचे चिंतन हे ईश्वरी संकल्पनांचे मानवी जीवनामध्ये प्रकटीकरण करणारे आहे. दुसरा विचार म्हणजे, गुरुनानक हे समाजाला प्रकाश देणारे श्रेष्ठ गुरू होते. त्यांचा विचार प्रेषित म्हणून नव्हे तर महागुरू म्हणून केला पाहिजे. तिसर्‍या विचारानुसार, गुरुनानक हे एक अवतारपुरुष होते. या तिन्ही प्रवाहांचे सार काढल्यास, गुरुनानक हे मानवतावादी संत होते आणि त्यांनी भारतीय संस्कृतीतील मानवतेचा श्रेष्ठ असा संदेश विश्वाला सांगितला.

– प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news