गर्भारपणात आयोडिनची शरीराला का आवश्यकता असते?

गर्भारपणात आयोडिनची शरीराला का आवश्यकता असते?
Published on
Updated on

आयोडिन हा शरीराच्या वाढीमध्ये महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. विशेषतः गर्भवती महिला आणि नवजात बालक यांना त्याचा अधिक त्रास होतो. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात आयोडिनचा समावेश केला पाहिजे.

आयोडिनची शरीराला का आवश्यकता असते ते समजून घेऊ.

हायपो थायरॉईडझम ः आयोडिन हा मायक्रोन्यूट्रिएंट आहे जो थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आयोडिनच्या कमतरतेमुळे हायपो थायरॉईडिझम होतो. योग्यवेळी याकडे लक्ष न दिल्यास गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. मूल न होणे, नवजात बालकाच्या मज्जासंस्थेशी निगडीत काही समस्या होण्याचा धोका वाढतो.

लक्षणे ओळखा ः

काही व्यक्‍तींमध्ये आयोडिनची पातळी कमी झाल्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. हायपो थायरॉईडजम झाल्याची अनेक लक्षणे आहेत. मात्र, काही लक्षणांमुळे ही गोष्ट सहजपणे लक्षात येते. स्नायू अशक्‍त असणे, मासिक पाळीच्या चक्रात बदल होणे, एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्‍ती कमी होणे, वजनात अचानक वाढ होणे, नैराश्य, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आणि हृदयाचे ठोके कमी होणे. यापैकी कोणतेही लक्षण दिसून आल्यास ताबडतोब तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

शरीरात आयोडिनची पूर्तता करण्यासाठी आहारात काही घटकांचा अवश्य समावेश करावा. पालक, राजमा, बदाम, डाळी, ओटस्, किनोआ नावाचे धान्य यांचा वापर करावा.

रोखणार कसे?

धूम्रपान बंद करा, धूम्रपानाचा थायरॉईडवर थेट परिणाम होतो. त्याचबरोबर निकोटिन शरीरात शोषले जाते, त्यामुळे हार्मोन्सच्या स्रवण्यावर परिणाम होतो. मूल न होण्यामागे ही गोष्ट हातभार लावते. आयोडिनच्या कमतरेमुळे जरी हायपोथायरॉईडचा त्रास होत असला तरीही आयोडिनचे सेवन हे प्रमाणातच केले पाहिजे. अति किंवा कमी प्रमाणात सेवन केल्यास आयोडिनसंबंधीचे त्रास वाढू शकतात. तसेच नियमित व्यायाम, योगसाधना आणि ध्यानधारणा करावी. त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळण्यास मदत होईल.

महिलांनी लक्ष द्यावे ः

मूल न होणे यासाठी केल्या जाणार्‍या उपचारांत हायपोथायरॉईडिजमवरील उपचार महत्त्वाचा भाग आहे. हायपोथायरॉईडवर उपचार केल्यानंतरही मूल होत नसेल तर दुसर्‍या उपचारांची आवश्यकता भासते. गर्भवती महिलांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील थायरॉईडच्या पातळीची चाचणी करून घ्यावी. तसेच पातळी योग्य राखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच उपाययोजना करावी.

* संपूर्ण जगभरात 20 टक्के महिलांमध्ये आयोडिनची कमतरता आहे. एका निरीक्षणानुसार 40 वर्षांहून अधिक वयात आई झाल्यास बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

महिलांवर प्रभाव जास्त –

महिलांच्या शरीरातील आयोडिनची कमतरता आणि प्रजनन कार्यप्रणाली यांचा थेट संबंध असतो. हायपोथायरॉईडिजम हेच वांझपणा आणि गर्भपात यांचे महत्त्वाचे कारण असते. थायरॉईड ग्रंथीची कार्यप्रणालीची गती मंदावते तेव्हा ते हार्मोन्सची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाहीत. त्यामुळे अंडाशयातून बीज बाहेर पडण्यात अडथळे येतात. मूल न होण्यामागे हे एक कारण आहे. ज्या महिलांना हायपोथायरॉईडिजमचा त्रास होतो त्यांच्या मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होतो तसेच गर्भधारणेतही समस्या निर्माण होतात. शिवाय त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यात अरुची निर्माण होते. हायपोथायरॉईडिजमचा त्रास असलेल्या महिलांना गर्भधारणा झाली तरी गर्भाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो.

* आत्यंतिक प्रमाणात आयसोफ्लेवेन्स झाल्यास हायपोथायरॉईडच्या गाठींची अवस्था गंभीर होते. सोया सप्लिमेंटस् आणि पावडर यांचे सेवन कमी प्रमाणात करावे. दिवसभर सोयाबीनचा एखादाच पदार्थ आहारात असावा. त्याचेही प्रमाण कमी असावे. ज्या मुलांना खूप लहानपणापासून सोयाबीनयुक्‍त पदार्थ खाण्यास दिले जातात त्यांना मोठे झाल्यावर थायरॉईडचा आजार जडण्याचा धोका अधिक असतो.

प्रा. प्राजक्‍ता पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news