खुर्ची वाचविण्यासाठी इम्रान खान यांची सुप्रीम कोर्टात धाव

खुर्ची वाचविण्यासाठी इम्रान खान यांची सुप्रीम कोर्टात धाव
Published on
Updated on

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खुर्ची जाण्याचे भय असल्याचे तीव्रतेने जाणवू लागल्याने त्यांनी आता शेवटचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बंडखोर खासदारांना अपात्र ठरवावे, असे आर्जव इम्रान सरकारने पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाला केले आहे.

येत्या 27 तारखेला होणार्‍या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानात या बंडखोर सदस्यांची मते मोजली जाऊ नयेत, अशी विनंतीही सरकारने न्यायालयाला केली आहे.

बंडखोर खासदार घोडेबाजारात मग्‍न आहेत. त्यामुळे पाकिस्तानी राज्यघटनेतील कलम 63 नुसार सर्व बंडखोर सदस्य अपात्र ठरतात. त्यांना नॅशनल असेम्ब्लीत (पाकिस्तानची संसद) प्रवेश करण्यास बंदी घातली जावी, असे या याचिकेत म्हटले आहे. तथापि, न्यायालयाने यासंदर्भात तातडीने कोणताही आदेश दिलेला नाही.

बहुमत संपुष्टात

सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांना 172 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. वास्तवात त्यांना 150 सदस्यांचाही पाठिंबा नाही. त्यामुळे इम्रान खान सरकारचे पतन अटळ आहे. यास्तव सरकारमधील अनेक मंत्री बंडखोर खासदारांना धमकावत आहेत. एवढेच नव्हे, तर विरोधी सदस्यांनादेखील धमक्या देण्याचे सत्र या मंत्र्यांनी आरंभले आहे. याच्या उलट विरोधकांचे संख्याबळ जवळपास 200 झाल्याचे मानले जात आहे.

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी आपले काका शहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे म्हटले आहे. सध्या शहबाज हे पाकिस्तान मुस्लिम लीग शरीफ गटाचे अध्यक्ष आहेत. मरियम यांनी सांगितले की, थोडी जरी लाज उरली असेल, तर इम्रान यांनी जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन त्वरित पंतप्रधानपदाची खुर्ची खाली करावी.

पद सोडा : लष्कराचा इम्रान खानना सल्‍ला

राजकीय वार्‍याची दिशा ओळखून पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी यापूर्वीच इम्रान खान यांना राजीनामा देण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे. इम्रान यांनी राजीनामा देऊन पंतप्रधानपदी सत्तारूढ पक्षातील अन्य एखाद्या नेत्याला बसवावे, असेही बाजवा यांनी इम्रान खान यांना सुचवल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news