

कोल्हापूर; कृष्णात चौगले : गेल्या वर्षभरापासून खतांच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे शेतीवर आधारित अर्थकारण कोलमडले आहे. खतांच्या वाढत्या किमती कमी व्हाव्यात व शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे अर्थकारण प्रामुख्याने शेती व्यवसायावर अलवंबून आहे. खत म्हणजे पिकांचा प्राण आहे. खतांशिवाय उत्पादन अशक्य आहे. मजुरी, औषधी खतांचे वाढलेले दर यामुळे शेतीचे अर्थकारण बिघडल्याचे चित्र आहे. बळीराजाला उत्पादीत शेतमाल खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था झाली आहे, तसेच शेतकऱ्यांना विजेअभावी पिकाला पुरेसे पाणी वेळेवर मिळत नाही. परिणामी उत्पन्नात घट होते. नैसर्गिक संकटे पाचवीला पुजलेली आहेत. या अशा सुलतानी संकटातून शेती बेभरवशाची झाली आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे.
शेती व शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही सातत्याने कोलमडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेत असतो. त्याबरोबर भात, भुईमूग, ज्वारी, मका अशी पिके ऋतुमानानुसार घेतली जातात. यामुळे या सर्व पिकांसाठी खतांची मोठी मागणी शेतकरी वर्गातून असते. खतांशिवाय पिकांचे उत्पादन घेणे अशक्य आहे. महागडी खते, औषधे वापरून उत्पादित पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे.
बळीराजाला उत्पादित शेतमाल हा कमी दराने विकावा लागत असल्याने खर्च जास्त व उत्पनातून मिळणारा मोबदला कमी अशी बिकट अवस्था झाली आहे. खतांच्या दरांच्या किमती गेल्या वर्षापासून टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी रासायनिक खतांच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.