

दुबई; वृत्तसंस्था : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसर्या सत्रासाठी आयसीसीने नव्या गुणप्रणालीची बुधवारी अधिकृत घोषणा केली. ही नियमावली भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या चार ऑगस्टपासून सुरू होणार्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून अंमलात येईल.
नव्या गुणप्रणालीनुसार प्रत्येक सामन्यातील विजेत्यास 12 गुण मिळतील. सामना अनिर्णीत राहिल्यास 4 गुण मिळतील. तर सामना टाय झाल्यास 6 गुण प्रदान केले जातील. यापूर्वी संपूर्ण मालिकेसाठी 120 गुण देण्यात येत होते. हे गुण कसोटी सामन्यांच्या संख्येवर विभागण्यात येत असत.
भारत आणि इंग्लंडदरम्यान ऑगस्टमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेपासून सुरू होणार्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) दुसर्या सत्रादरम्यान विजय मिळवणार्या संघास 12 गुण, सामना ड्रॉ झाल्यास 4 गुण आणि सामना टाय झाल्यास 6 गुण मिळतील. असे बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अधिकृतरीत्या स्पष्ट केले. मिळवलेल्या गुणांच्या सरासरीचा उपयोग हा 2021-2023 च्या सत्रादरम्यान स्थानांचे निर्धारण करण्यासाठी केले जाईल, असे आयसीसीकडून सांगण्यात आले.
जून 2023 मध्ये संपणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसर्या सत्रात पाच कसोटी सामन्यांच्या केवळ दोन मालिकांचा समावेश आहे. ज्यामध्ये भारत-इंग्लंड संघांमधील मालिकेशिवाय यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार्या अॅशेस मालिकेचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया पुढील वर्षीच्या भारत दौर्यात चार कसोटी सामने खेळणार आहे. ही एकमात्र चार सामन्यांची मालिका असेल. नऊ कसोटी संघ एकूण सहा-सहा मालिका खेळणार आहेत. यामध्ये गेल्या वेळी प्रमाणे तीन मालिका स्वदेशात आणि तीन मालिका विदेशात खेळायच्या आहेत.
गुणप्रणाली होईल अधिक सुलभ
गुणप्रणालीतील नव्या बदलाने ही प्रणाली आणखी सोपी करण्यास मदत मिळणार आहे, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ एलारिडिस यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आम्हाला जुन्या गुणप्रणालीबाबत काही फिडबॅकस् मिळाले होते की, ही प्रणाली आणखी सोपी करण्याची आवश्यकता आहे. नव्या प्रणालीमुळे आता प्रत्येक सामन्यात दोन्ही संघांना सन्मान मिळणार आहे. कारण, जुन्या प्रणालीत दोन ते पाच सामने असावयाचे. यामुळे गुणांवर परिणाम व्हावयाचा. आता तसे होणार नाही.