

कोल्हापूर, अनिल देशमुख : कोल्हापूरच्या पर्यटनाचे अंतरंग आता कॉफी टेबल बुकमधून उलगडणार आहेत. पर्यटनवाढीसाठी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. हे कॉफी टेबल बुक देशभरासह जगभरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचवण्याचाही प्रयत्न आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर, दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा, नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर, वास्तुशिल्पकलेचा अद्वितीय नमुना असणारे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर अशी धार्मिक पर्यटन स्थळे, इतिहासाच्या पाऊलखुणांची साक्ष देणारा पन्हाळा, विशाळगड, रांगणा, पारगड अशा गडकोटांसह जुना राजवाडा, टाऊन हॉल म्युझियम, राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि स्मृतिस्थळ, दाजीपूर अभयारण्य, सह्याद्री व्याघ— प्रकल्प, मसाई पठार ही ठिकाणे पर्यटनाचा समृद्ध वारसा मानली जातात.
रंकाळा तलाव, नवीन राजवाडा, कणेरी मठ, रामलिंग, राजर्षी शाहू महाराजांच्या कल्पनेतून साकार झालेले स्वयंचलित दरवाजे असणारे राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण, राऊतवाडी धबधबा, पन्हाळा तालुक्यातील जेऊर येथील व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्क या साहसी पर्यटक केंद्रासह खाद्यसंस्कृतीसाठी कोल्हापूर सर्वपरिचित आहे. तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, वडापावसह अनेक नानाविध चविष्ट पदार्थांची चव कोल्हापुरात चाखायला मिळते. या ठिकाणचा गूळ, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, बॅडगी मिरचीला जगभरात मागणी आहे. या सर्व बाबींमुळे जगभरातील पर्यटक कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत असतात. त्यांची संख्या वाढावी, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, पर्यटनातून जिल्ह्याचा विकास व्हावा या हेतूने कोल्हापूरचे पर्यटक सर्वदूर जावे याकरिता हे कॉफी टेबल बुक तयार करण्यात येत आहे.
कोल्हापूरची संपन्न संस्कृती, इथली माणुसकी, कोल्हापूरकरांचा मोकळेपणा व खरेपणा हे सर्व अनुभवण्यासाठी कोल्हापूरला नक्कीच आलं पाहिजे. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती, मसाले, कलाकुसर, हस्तकला, हुपरीतील चांदीचे दागिने आणि चांदी उद्योग तसेच इथली संपन्न शेती, अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात येणारे कृषी पूरक व्यवसाय, टेक्स्टाईल इंडस्ट्री, धातू उद्योग पाहण्यासाठी पर्यटकांनी इथे यायला हवे. खास करून येथील संपन्न पर्यटनस्थळे, किल्ले, निसर्ग सौंदर्य, जंगले, अभयारण्य पाहण्यासाठी तर आवर्जून 'कोल्हापूरला यायलाच लागतंय' अशी साद या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून जगभरातील पर्यटकांना घातली जाणार आहे.
माहितीपट आणि रिल्सही बनणार
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची माहिती देणारे छोटे माहितीपटही बनवले जाणार आहेत. त्याद्वारे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळाची माहिती करून दिली जाणार आहे. पर्यटन स्थळावर आधारित रिल्सही बनवले जाणार आहेत. त्याचेही काम सध्या सुरू आहे.